बाधित शिक्षक आणि दुकानदारांमुळे शहरात मोठय़ा प्रमाणात संसर्ग पसरण्याची भीती
अमळनेर (प्रतिनिधी)शहरात पुन्हा कोरोनाचा विस्फोट होऊ लागला आहे. शहरातील एकाच शाळेचे पाच शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. तर त्यातील दोन शिक्षक शाळाबाह्य सर्वेक्षण करणारे होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. तर आज शनिवारी केलेल्या अँटीजेन चाचण्यात २० जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात काही दुकानदारांचा समावेश आहे. त्यामुळे शहराला पुन्हा कोरोनाचा विळखा पडू लागला आहे.
अमळनेर शहरासह तालुक्यात दुसर्या टप्प्यातील कोरोना पुन्हा पाय पसरू लागला आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत. आज शनिवारी लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात विविध दुकानदार व ग्राहकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात काही दुकानदार देखील पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात त्यांच्या परिवारातील सदस्य देखील पॉझिटिव्ह आले आहेत.
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण तात्काळ थांबवा
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करणारे खाजगी शाळेतील २ शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत त्याच शाळेतील मुख्याध्यापक आणि इतर २ शिक्षक असे एकूण ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम तातडीने बंद करून शिक्षकांना अनावश्यक शाळेत बोलावणे देखील बंद करण्यात यावे अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. ज्या शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह येत आहेत तेथे किमान ७ दिवस शाळेत शिक्षक एकत्र येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशीही मागणी होत आहे.