तिलोत्तमा पाटील व प्रफुल पाटील यांच्यात पदभार घेण्यावरून होतोय वैचारिक वाद
अमळनेर (प्रतिनिधी) बाजार समित्यांच्या बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत जिल्हा उपनिबंधक आणि कर्मचारी संभ्रमात आहे. त्यामुळे अमळनेर येथील बाजार समितीत प्रशासक आणि माजी पदाधिकारी यांच्यात खुर्चीचा किस्सा चांगलाच रंगू लागला आहे. तर उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत जिल्हा उपनिबंधक आणि कर्मचाऱ्यांनी अभियोक्त्यांकडून मार्गदर्शनही मागवले आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाकडून नियुक्त प्रशासक मंडळ रद्द बातल ठरवले आहे. या आदेशात जिल्ह्यातील जामनेर , पाचोरा आणि अमळनेर बाजार समित्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी पदभार घेतले आणि माजी सभापती पुन्हा खुर्च्यांवर विराजमान झाले. मात्र अमळनेर येथे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त झाले असल्याने हा निर्णय आम्हाला लागू नाही, असा पवित्रा मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी घेतला होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी बाजार समितीत येऊन पदभार घेतला. त्यावेळी प्रफुल पाटील देखील उपस्थित होते. काही वेळात प्रफुल पाटील निघून गेले. दुपारी पुन्हा प्रफुल पाटील आले व त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाने आम्ही पात्र असल्याचे सांगितले. दोघे जण त्यांच्या मतावर ठाम होते. प्रफुल पाटील यांच्या वतीने अॅड गोपाल सोनवणे बाजू मांडत होते. त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत शासनाचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत दोघे जण बसा वाद मिटवा, अशी भूमिका मांडली. काही वेळात तिलोत्तमा पाटील व त्यांच्या गटाचे सदस्य निघून गेले. नंतर पंधरा मिनिटात प्रफुल पाटील व त्यांच्या गटाचे सदस्य निघून गेले.
वरिष्ठ अधिकारी आदेश देत नाही, तोपर्यंत मी काम पाहणार
न्यायालयाच्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकारी मला आदेश देत नाही, तोपर्यंत मी मुख्य प्रशासक म्हणून काम पाहिल, असे ठामपणे तिलोत्तमा पाटील यांनी सांगितले. याबाबत पत्रकारांनी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत सरकारी वकिलांकडे मार्गदर्शन मागवले आहे, त्यांनी निर्णय दिल्यानंतर तशी अंमलबाजवणी होईल, असे सांगितले.