वॉचमनचा खून करून ट्रक पळवून नेत एका चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ७ वर्षांची ठोठावली शिक्षा

अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने दिला निकाल, व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी

अमळनेर (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील नगाव येथे एका वॉचमनचा खून करून ट्रक पळवून नेत पारोळा तालुक्यात एका दुसर्‍या वाहन चालकाला डोक्यात टॉमी मारून गंभीर जखमी करणाऱ्या दोघं सराईत गुन्हेगारांना अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे खटल्याचे कामकाज झाले. आरोपी धुळे कारागृहात होते.
या खटल्याची सविस्तर हकिगत अशी की, धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील गोपाळ गोकुळ बनकर हा १३ जानेवारी २०१८ रोजी दुपारी साडे तीन वाजता पारोळ्याहून  माल भरून बोरकुंड जाण्यासाठी त्याच्या ४०७ वाहनाने (एमएच – १८, एए- ९५४२)  जात असताना पारोळ्याहून काही किमी अंतर गेल्यावर समोरून येणाऱ्या ट्रक( एम एच – १९, एई- ९७८६) रस्त्यात आडवी केली व दोघांनी वाहनात प्रवेश करून चालक गोपाळला ढकलून त्याच्या डोक्यावर टॉमी मारली आणि त्याला सीट खाली दाबून त्याच्याकडून 1200 रुपये, मोबाईल हिसकावून घेतला व गाडी पारोळ्याकडे वळवून जोरात निघाले. मात्र त्यातील एकाला गाडी नीट चालवता येत नव्हती म्हणून दुसऱ्याने आरोळी मारली की सुनील तुझे गाडी चलाती आती नही. छोटी गाडिसे जायेंगे. तेव्हढ्यात गाडी मोंढाळे हायस्कूल जवळ कंपाऊंड जवळ ठोकली गेली व फसली. लोक धावत येऊ लागले. त्यावेळी दोघे आरोपी पळून गेले. गोपाळला दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात येऊन पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपास अजितसिंग देवरे यांनी केला होता. त्यात आरोपींनी वापरलेल्या ट्रक (एमएच- १९ एई – ९७८६)  नसून ते एमएच १८ ए ए ४५६३ क्रमांकाचे असून ते आरोपी अनवरखान नसिरखान पठाण (रा. उंदिरखेडा ता. पारोळा ह. मु. हजाराबस्ती अलहेरा धुळे) आणि सुनील भाऊराव बोरसे (मूळ रा दत्ताने गव्हाणे ता. शिंदखेडा ह. मु. मोहाडीनगर धुळे) या दोघांनी घटनेच्या काही दिवसांपूर्वी नगाव (ता. धुळे) येथून एक वॉचमनचा खून करून चोरून आणली होती असे उघडकीस आले. 9 मार्च 18 रोजी आरोपींना अटक करण्यात आली होती. दोघेही सराईत गुन्हेगार असून दोघांनी शिरपूर , शिंदखेडा , धुळे ,नवापूर , पारोळा येथे 7 तर चाळीसगाव येथे 8 गुन्हे केले होते. हा खटला व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. आरोपी धुळे कारागृहात होते. तेथे कॅमेरे व टीव्ही लावण्यात आले होते. सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी १० साक्षीदार तपासले. न्या. व्ही. आर. जोशी यांनी साक्ष ग्राह्य धरत दोघं आरोपीना ७ वर्षाची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड फिर्यादीला देण्याची शिक्षा सुनावली. केस वॉच म्हणून योगेश पाटील व पैरवी अधिकारी म्हणून हिरालाल पाटील यांनी काम पाहिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *