पहाटे ३ वाजता फेसबुकवर लाईव्ह पोस्ट करून उपमुख्याधिकारी बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ
थेट आयजींनी घातले लक्ष, पोलिस अधीक्षक अमळनेरात तळ ठोकून
अमळनेर (प्रतिनिधी) मी अमळनेर नगरपालिकेचा उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड… मी माजी सैनिक आहे… वरिष्ठांच्या आदेशाने मी नगरपालिकेचे काम करत होतो… माझे काम करत नव्हतो…तरी मला मारहाण झाली.. शिवीगाळ केली… माझा गुन्हा कोणी दाखल करत नव्हते… आयजी व अप्पर पोलिस अधीक्षकांनी सांगूनही गुन्हा दाखल होत नसेल.. न्याय भेटत नसेल.. तर मेलेले बरे… मी पेट्रोल टाकून जाळून घेतो… माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ करा… अशी पहाटे तीन वाजेच्या सुमारास फेसबुकवर लाईव्ह पोस्ट टाकून संदीप गायकवाडे हे बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. तर त्यांनी या व्हिडिओत शहरातील काही व्यक्तींची नावे घेऊन पोलिस निरीक्षकांची बेबंदशाही कृती आणि घाणेरडे राजकारण करून सामाजिक रंग देणाऱ्यांचा बुरखा फाडल्याने पोलिस यंत्रणा हादरली थेट आयजींनी लक्ष घातल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकही अमळनेरात तळ ठोकून आहेत.
महाराष्ट्र शहर विद्रूपण कायद्यानुसार बेकायदेशीर फलक काढण्यावरून शहरात उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड आणि जैन समाजाच्या लोकांमध्ये वाद झाले होते. त्यांनतर त्या वादाला सामाजिक रंग देऊन धार्मिक भावना दुखावल्याचे निमित्त करून जैन समाजाने प्रांत, तहसील व पोलिस स्टेशनला मोर्चा काढून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याच वेळी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनाही धक्का बुक्की, मारहाण व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र गायकवाड हे एक वरिष्ठ अधिकारी असतानाही बरेच तास उलटूनही पोलिस निरीक्षक अंबादास मोरे हे गुन्हा दाखल करत नव्हते म्हणून गायकवाड यांनी आयजी प्रतापराव दिघावकर, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक मोरे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगितले. मात्र तरीही पोलिस निरीक्षक मोरे यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. वरिष्ठांच्या आदेशालाही पोलिस निरीक्षक मोरे जुमानत नाहीत. आपण स्वतः माजी सैनिक आणि एक वरिष्ठ अधिकारी असूनही ते दाद देत नाहीत, म्हणून न्याय मिळण्याची अपेक्षाच संपल्याने व्यथित होऊन संदीप गायकवाड यांनी पहाटे तीन वाजेच्या सुमारास फेसबुकवर लाईव्ह पोस्ट टाकून शहरातील काही व्यक्तींची नावे घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून त्यांनी व्हिडिओत पेट्रोल टाकून जाळून घेतो असा इशारा दिला आणि त्यांचा मोबाईलनंबरही बंद झाला.
पत्नीने दिली पोलिसांत हरवल्याची नोंद
संदीप गायकवाड यांच्या पत्नीने पोलिसात हरवल्याची नोंद केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काल रात्री माझ्या पती सोबत मी पोलिस स्टेशनला आली होती. रात्री २ वाजता त्यांनी मला पुढे घरी जाण्यास सांगितले आणि नंतर अडीच वाजेला परेश उदेवाल याला घेऊन विप्रो बोगद्यपर्यंत घेऊन आले व त्याला तिथेच उतरवून ते निघून गेले. त्यानंतर ते घरीच आले नाहीत, असे गायकवाड यांच्या पत्नी वर्षाराणी गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे या घटनेने शहरात खळबळ उडाली असून रात्री पासून पोलीस गायकवाड यांचा शोध घेत आहेत. एलसीबीकडून तांत्रिक बाबींचा उपयोग करून कोणाकोणाशी संपर्क झाला आहे, काही माहिती मिळते का याचा शोध सुरू आहे. गायकवाड राजकारणाचे बळी पडले की भ्रष्ट व्यक्तींच्या दडपणाला बळी पडले याविषयी शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
गायकवाड प्रकरणात आयजींनी घातले लक्ष
वर्षा गायकवाड यांनी पोलिसात पती गायकवाड हे दोन दिवसांपासून संपर्काबाहेर व बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. ही बाब आयजी प्रतापराव दिघावकर यांना माहिती पडताच त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार ते दुपारपासून अमळनेरला दाखल झाले आहेत. तर गायकवाड यांचा शोध घेण्यासाठी पथकांची नियुक्ती केली असून पोलिस अधीक्षक मुंडे हे वेळोवेळी तपासास गेलेल्या पोलीस पथकाच्या संपर्कात आहेत.
पोलिस अधीक्षक मुंडे म्हणाले…
पत्रकारांशी बोलतांना पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले, बुधवारी जैन समाजाकडून संदीप गायकवाड यांनी बॅनर फाडल्याची दिलेली तक्रार दाखल झालेली आहे. त्यानंतर संदीप गायकवाड देखील आपली लेखी तक्रारी अर्ज घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यांनीही पोलीस ठाण्यात अर्ज दिला असून माझी फिर्याद घेतली नाही, असे सांगत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. तेव्हापासूनच ते संपर्कात नसल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसात दिलेली असून सकाळी ४ वाजेपासूनच पोलीस पथक तपासाला गेले आहे. तपास पथक हे लोकेशनवरून चोपडा येथे गेले आहेत. त्यांचा लवकरात लवकर कसा संपर्क होईल याबाबत पोलीस शोध घेत आहेत.
बॅनर अधिकृत की अनधिकृतबाबत संभ्रम, अधिकाऱ्याचा जाऊ नये बळी
शहरात सर्व लागलेले होर्डिंग्ज अधिकृत की अनधिकृत आहेत याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तर एक वर्षांपासून करार नसताना व गतवर्षी कोरोनाचा संसर्ग असताना जाहिराती लावण्याचे टेंडर नगरपालिकेकडून निघालेले नाही. त्यामुळे जुनाच टेंडरधारक सध्या बॅनर लावत होता. त्यामुळे त्याने पालिकेला किती पैसे दिले, यावर ५१ हजार रुपये दिले असल्याचे पालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे होर्डिंग्ज प्रकरणात कर भरणे अथवा बुडवेगिरी याबाबत संदिग्धता आढळून येत आहे. याबाबत पालिका खुलासा करायला तयार नाही. अथवा अधिकाऱ्याची बाजू खरी की खोटी याबाबत स्पष्टता करायला तयार नाही. एकही अधिकारी या प्रकरणात पुढे आलेला नाही यामुळे या प्रकरणात पेच आणखी वाढला आहे. तर या बॅनर प्रकरणात देश सेवा केलेल्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.