अमळनेर( प्रतिनिधी) तालुक्यातील सात्री येथे सरपंच, उपसरपंच निवडणुकीनंतर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीला बंदी असतानाही मिरवणूक का काढली असे विचारल्याचा राग आल्याने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून स्वतंत्र गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सात्री दि. १२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक शांततेत पार पडली. त्या अनुषंगाने सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास गावातील शालिक बोरसे, महेंद्र बोरसे, रावसाहेब बोरसे, सुनील बोरसे, प्रमोद बोरसे, मनोहर बोरसे यांनी गावात मिरवणुकीसाठी बंदी असताना बँड लावून विजयी मिरवणुक काढली. या मिरवणुकीत गुलाल उधळला तसेच गुलाल उधळण्यासाठी जेसीबीचा देखील वापर करण्यात आला. मात्र ही मिरवणूक चालू असताना पुनिलाल सखाराम पाटील यांच्या घरासमोर मोठमोठ्याने ओरडून गुलाल उधळून फटाके फोडले. यावेळी त्यांनी “माझी पत्नीदेखील निवडणुकीत विजयी झाली आहे, मात्र मिरवणूक काढण्यास मनाई असताना तुम्ही माझ्या घरासमोर फटाके का फोडत आहेत” असे विचारले. असे बोलण्याचा राग आल्याने महेंद्र बोरसे यांनी पुनिलाल पाटील यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या शालिक बोरसे यांनी देखील पुनीलाल पाटील, यांच्यासोबत असलेल्या पाच सहा घरासमोर गुलाल उधळून फटाके फोडले असून शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याने वरील आरोपीविरुद्ध मारवड पोलिसात भादंवि कलम १४२, १४३, ५०४, ५०६, १३५, ३७ (१) सी अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पो. हे. कॉ. मुकेश साळुंखे करीत आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्या मिरवणूक न काढण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.