पती शेतात, पत्नीने शेजारी सांजोऱ्या लाटल्या आणि चोरटय़ाने संधी साधत घरातून दोन लाखाचे दागिने लुटले

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील फापोरे येथे ३१ डिसेंबर रोजी वर्षाच्या शेवटच्या दिवशी पती शेतात गेले असताना व पत्नी गावातच सांजोऱ्या लाटायला गेली असताना चोरट्याने  भर दुपारी घराचे कुलूप उघडून सुमारे दोन लाखाचे ५० ग्राम सोन्याचे दागिने चोरून नेले. यामुळे खळबळ उडाली आहे. चोरटय़ाने पद्धतशीरपणे लक्ष ठेऊन ही चोरी केल्याचे दिसून येत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील फापोरे येथील किशोर युवराज पाटील हे ३१ रोजी सकाळी ९ वाजता शेतात निघून गेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी गावातील नातेवाईक अमृतराव पाटील यांच्या घरी सांजोऱ्या करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावून घराची किल्ली तुळशी वृंदावन खाली ठेवली. दुपारी तीन वाजेला त्या परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्याना पती परत आले असतील असे वाटले. मात्र ते घरात आढळून आले नाही म्हणून त्यांनी घरत अधिक शोधाशोध केली असता त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास सुभाष महाजन करीत आहेत.

चोरटय़ाने असा मारला डल्ला

चोरटय़ाने घरातील लोखंडी कपाटातील ३० हजाराचा  १० ग्राम  सोन्याचा नेकलेस ,३६ हजार रुपये किमतीचा १२ ग्राम सोनसाखळी , ६९ हजार रुपयांचा २३ ग्राम वजनाची सोनसाखळी , १२ हजार रुपये किमतीचा ४ ग्राम सोन्याचा तुकडा , साडे चार हजार रुपयांचा दीड ग्राम सोन्याचा तुकडा असे एकूण ५० ग्राम सोने एक लाख ८७ हजार ५०० रुपयांचे अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

चोरटा परिचित असल्याचा संशय

विशेष म्हणजे चोरट्याने घरातील वस्तू अस्ताव्यस्त करताना चांदी चे दागिने व इतर वस्तू याना हात न लावता त्या वस्तू तशाच पडू दिल्या आहेत. त्यामुळे चोरट्याचा फक्त सोने चोरण्याचा उद्देश असावा आणि लपवलेली किल्ली शोधून किल्लीने कुलूप उघडून चोरी केल्याने चोर परिचितांमधील असावा किंवा घरावर लक्ष ठेवून असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.   

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *