उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या पथकाने केली कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी)उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने तालुक्यातील शिरसाळे येथे छापा टाकून झन्ना-मन्ना जुगार खेळताना सहा जणांना रंगेहात पकडून मुसक्या आवळल्या. त्यांच्याजवळून रोख रक्कम व पाच दुचाकी असा सुमारे सव्वा लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांना गोपनीय माहिती मिळल्यावरून त्यांनी हितेश बेहरे , प्रकाश चव्हाण , चंपालाल पाटील , प्रशांत पाटील यांचे पथक तयार करून शिरसाळे येथील विहिरीजवळ छापा टाकला. तेथे रईस शेख मस्जिद , पंडित पितांबर पाटील , निसार शेख नासिर , रियाजोद्दीन सिराजोद्दीन शेख , पोपट अर्जुन चौधरी ( सर्व रा शिरसाळे) व संभाजी आत्माराम पाटील ( रा. पिंपळे) हे पत्त्यांचा झन्ना -मन्ना जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करून त्यांची अंगझडती घेऊन त्यांच्याजवळील रोख रक्कम आणि ५ दुचाकी जप्त करण्यात आले. हितेश बेहरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवाड पोलीस स्टेशनला जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारवड येथेही छापे टाकून तिघांना अटक
तसेच हेडकॉन्स्टेबल पंकज पाटील , विलास गायकवाड , धनंजय पाटील , कैलास साळुंखे ,फिरोज बागवान , सुनील तेली यांनी देखील मारवड येथे छापे टाकून सेंट्रल बँके मागे जुगार खेळतांना सुनील दिलीप जगदाळे , शिवदास बाबुराव पाटील याना अटक करून त्यांच्या जवळील ५ हजार ६०१ रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच मारवड येथे पाण्याच्या टाकी मागे राजेंद्र पवार यांना देखील जुगार खेळताना अटक करण्यात आली त्याच्याकडून १२३५ रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.