मोर्चासाठी अमळनेरहून लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रवाना
अमळनेर (प्रतिनिधी)केंद्र शासनाने अंबानी आणि अदानी यांच्या भल्यासाठी शेतकरी विरोधातील काळे कायदे केले आहेत. याचा अंबानींना जाब विचारण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी मुंबईत अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने अंबानी कार्पोरेट हाऊसवर मोर्चा नेत आहेत.
या मोर्चासाठी अमळनेरहून लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी सोमवारी अमळनेर येथून रवाना झाले आहेत. यासाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात एकत्र आले. यावेळी काँग्रेससह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे यांनी सपत्निक हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर वाहने मुंबईकडे रवाना झाली. यावेळी महिला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, बन्सीलाल भागवत , अशोक पवार , रियाज मौलाना , सत्तार तेली , सागर पाटील, संदीप घोरपडे , सईद तेली , एस. डी. देशमुख , सनी गायकवाड यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.