अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील सराफ बाजारात शॉट सर्किटने आग लागून दुकान पूर्ण खाक होऊन सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी २१ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. तर दगडी दरवाज्याच्या कामामुळे सराफ बाजाराचा रस्ता बंद असल्याने नगरपालिकेचा अग्निशामक बंब पोहचू शकला नाही. त्यामुळे दुकानांचे अधिकच नुकसान झाले.
सराफ बाजारातील मनीषा महेंद्र शेंडे यांच्या खुशी अलंकार या दुकानाला साडे सात वाजेच्या सुमारास शॉट सर्किट ने आग लागली. दगडी दरवाज्याच्या कामामुळे सराफ बाजारातील रस्ता बंद करून ठेवण्यात आला आहे. पर्यायी रस्ता देखील उपलब्ध नसल्याने नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचू शकला नाही परिणामी आगीचे प्रमाण वाढत गेले. दुकानातील कापड , अस्तर , कॉस्मेटिक साहित्य , कटलरी साहित्य असे सुमारे ९ ते १० लाखाचे साहित्य जळून खाक झाले. माजी नगरसेवक गोपी कासार , जय बजरंग मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी वेळेवर आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.