अमळनेर (प्रतिनिधी) शहापूर रस्त्याची दुरावस्था झाल्याने कळमसरे-शिरपूर बसचा मार्ग बदलण्यात आला आहे. यामुळे कळमसरेसह पाडळसरे,नीम गावातील प्रवाशांचे हाल होत असल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे.
दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाल्याने धुळे, नंदुरबार, शिरपूर, शिंदखेडा आदी भागात जाण्यासाठी कळमसरेमार्गाने जाणारी शिरपूर बस सोयीस्कर असल्याने प्रवाशांना याचा मोठा दिलासा होता. मागील वीस वर्षांपासून अखंड याच मार्गाने धावणारी बससेवा शहापूर रस्ता खराब झाल्याने बंद करण्यात आली आहे. कळमसरेसह परिसरातील प्रवाशांनी ही बस कळमसरे, वासरे शहापूर मार्गाने सुरू व्हावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या सहा ते सात वर्षांपासून शहापूर रस्त्यावर डांबरीकरण झाले आहे किंवा नाही हेच कळत नाही. मोठमोठे खड्डे पडलेले असून दुचाकी चालवणे अशक्य झाले आहे. मात्र मागील सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी या रस्त्याविषयी कुंभकर्ण झोप घेत असल्याचे सोंग घेत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. परीसरातील रस्त्यांचे कामे झाले असून शहापूर रस्ता दुर्लक्षित झाल्याने या रस्त्यावर सद्यस्थितीत एकही वाहन जात नाही. मारवड मार्गाने जाणारी शिरपूर बस कळमसरे-वासरे मार्गाने सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली असून लोकप्रतिनिधींनी आत्तातरी लक्ष घालावे असेही मत व्यक्त होत आहे.