तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ आमदारांच्या मध्यस्थितीने गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) शहारात चोरट्यांनी आता चोरीसाठी वेगवेगळे फंडे सुरू केले असून वृद्ध दांपत्याला चक्क रिक्षात बसवून ३ लाखांच्या दागिण्यांसह रोखड लंपास करून गंडवल्याचा प्रकार मंगळवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडला. तर पोलिसानी या दांपत्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने अखेर आमदारांच्या मध्यस्थितीने गुन्हा दाखल करण्यात आला. आधीच गंडवले गेल्याने त्यात पोलिसांनी सहकार्य न केल्याने या वृद्ध दांपत्याची नाहक ससेहोलट झाल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली.
अमळनेर तालुक्यातील वावडे येथील आनंदराव केशवराव पाटील व त्यांच्या पत्नी कस्तुरबाई हे मंगळवारी ८ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातून लग्नाहून अमळनेरला परत आले. बसस्थानकावरून ते वावडे जाण्यासाठी बाहेर निघाल्यावर रिक्षावाल्याने वावडे -वावडे असा आवाज दिल्यावर वृद्ध दाम्पत्य त्या रिक्षात बसले. त्यात आधीच दोन महिला बसल्या होत्या. रिक्षाचालकाने ढेकू रोडवर अॅड. ललिता पाटील यांच्या घराजवळ रिक्षा आल्यानंतर तिथे या दांपत्याला खाली उतरवून रिक्षातील महिलांना भडगाव जाण्यासाठी बसस्टँडवर सोडून येतो असे सांगून पोबारा केला. बराच वेळ वाट पाहूनही रिक्षा परत न आल्याने अखेर हे वृद्ध दांपत्य दुसऱ्या वाहनाने वावडे गेले. मात्र घरी गेल्यावर त्यांना ९० हजार रुपये किमतीच्या ३ तोळ्यांच्या बांगड्या , ९० हजार रुपये किमतीचा 3 तोळ्याचा व ९० हजार रुपये किमतीची 3 तोळ्यांची पोत आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. त्यांनतर हे वृद्ध दांपत्य फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले असता पोलिसांनी रिक्षा नंबर आणा मग गुन्हा दाखल करतो, असे सांगून त्यांना परत पाठवले. अखेर फिर्यादीने आमदार अनिल पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. त्यानंतर आमदार पाटील यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहेत.
रिक्षाचालकाच्या रुपात चोरटे सक्रीय
दरम्यान, दोन दिवसापूर्वीच बसस्थानकातून फैजपूर जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत धक्का देऊन लंपास केली होती. त्यानंतर लगेच मंगळवारी प्रवाशी रिक्षात बसवून वृद्ध दांपत्याला लुटले आहे. यामुळे चोरटा रिक्षाचालक कोण आहे, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागत आहेत, तर रिक्षा संघटनेने आणि नियमित असलेल्या रिक्षाचालकांनीही सर्तक राहून अशा चोरट्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना मदत करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा रिक्षातील प्रवासही सुरक्षित राहणार नसेल तर नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.