अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेत लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी आढळून आल्याने मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी आस्थापनाचे वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशीव यांच्यावर ठपका ठेवत निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की, स्वेच्छा निवृत्त किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागेवर वारसाला नेमणूक करण्याचे २७ अर्ज प्रस्ताव प्राप्त झाले होते. १५ ऑक्टोबर २०२० रोजी सादर केलेली व ३ नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या यादीत तफावत आढळून आली. त्यात २६ नंबरचे नाव वगळण्यात आले होते. त्यात अर्जदाराचे कोणतेही अर्ज आढळून आले नाही. तसेच याबाबत अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना यांची ही तक्रार प्राप्त झाल्याने मुख्याधिकारी गायकवाड यांनी आस्थापनाचे वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशीव याना करणे दाखवा नोटीस दिली होती. याबाबत खुलासा मागवण्यात आला होता. मात्र खुलासा अमान्य करत मुख्याधिकारी गायकवाड यांनी नगरपालिका अधिनियम १९६५ च्या कलम ७९ नुसार लिपीकला निलंबित केले असून या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येणार आहे.