टप्प्याटप्प्याने संपूर्ण ५२ गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार : आमदार अनिल पाटील यांची माहिती
अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यात गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत २० गावातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपुर्ण ५२ गावातील बाधित शेतकऱ्यांना एकूण १२ कोटी अनुदान मिळून १०० टक्के न्याय मिळेल, अशी ग्वाही आणि माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे. तसेच ही अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, अमळनेर तालुक्यातील रुंधाटी, मुंगसे, मठगव्हान, नालखेडा, गंगापुरी, दापोरी खुर्द, खापरखेडा प्र.ज, पातोंडा, बोहरा, कळमसरे, धावडे, सावखेडा, निम, जळोद, पाडळसरे आदी १५ गावातील शेतकरी नियमित कर्जदार असल्याने त्यांना अनुदानाऐवजी जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. आता अनुदान प्राप्त झालेले २० गावातील शेतकरी जुलै २०१९ च्या अतिवृष्टीत बांधीत (नुकसानग्रस्त) झाले होते, तर सप्टेंबर २०१९ मध्ये ३२ गावातील शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते, महसूल विभागामार्फत एकूण ५२ गावांचा नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, त्यानंतर या संपूर्ण ५२ गावातील शेतकरी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सतत प्रयत्न सुरू होते, अखेर शासनाने यास मंजुरी दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात जुलै २०१९ च्या अतिवृष्टीतील २० गावांसाठी ५ कोटी अनुदान प्राप्त झाले असून उर्वरित ३२ गावातील शेतकऱ्यांना देखील लवकरच सात कोटी रुपये अनुदान प्राप्त होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ
शासनाच्या निकषानुसार बिगर कर्जदार म्हणजेच ज्यांनी पीक कर्ज घेतले नसेल किंवा थकबाकीदार असतील अश्या शेतकऱ्यांचा अनुदानात समावेश असून त्यांना १ हेक्टर पर्यंत २०४०० याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असेल म्हणजे नियमित कर्जदार असतील त्यांना सहाय्यक निबंधक व जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत १ हेक्टर पर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.
५ कोटीचे अनुदान झाले प्राप्त
जुलै २०१९ मधील अतिवृष्टीमुळें बाधित २० गावांसाठी ५ कोटी अनुदान प्राप्त झाले असून सप्टेंबर २०१९ मध्ये बाधित झालेल्या ३० गावातील शेतकऱ्यांचे अनुदान अजून प्राप्त व्हायचे आहे. प्राप्त ५ कोटी अनुदान लवकरच शेतकऱ्यांना वितरित केले जाईल.
मिलिंदकुमार वाघ तहसीलदार, अमळनेर.