ग्रामपंचायतकडून शाळांना थर्मल गन आणि ऑक्सिमिटर देण्यास केली टाळाटाळ
अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावत शाळांना थर्मल गन आणि ऑक्सिमिटर देण्यास टाळाटाळ केली. तसेच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ १४.७२ टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले. तर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जिवाशी खेळून साहित्य न पुरवणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अमळनेर तालुक्यातील ९ वी ते १२ वी च्या ८१ पैकी ६३ शाळा मंगळवारी पहिल्या दिवशी उघडण्यात आल्या. तालुक्यातील १६३४९ विद्यार्थ्यांपैकी फक्त २४०७ विद्यार्थी शाळेत आले होते. म्हणजे फक्त १४.७२ टक्के विद्यार्थी शाळेत आले. ६९९ शिक्षकांपैकी ६२३ शिक्षक शाळेत हजर होते तर ४०८ पैकी ३५५ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अनेक ठिकाणी मुलांचे स्वागत करण्यात आले तर प्रत्येक विद्यार्थ्यांचे तापमान आणि ऑक्सिजन तपासण्यात आले सॅनिटायझर , हँडवॉश आदी सुविधा उपलब्ध केल्या होत्या. अगदी पहिल्या प्रकरणापासून सुरुवात झाल्याने खऱ्या अर्थाने शाळेचा पहिला दिवस होता.
जिल्हाधिकारी व जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्त आदेश देऊन आणि गटविकास अधिकाऱ्यांनी दोनदा पत्रक देऊनही अनेक ग्रामपंचायतींनी शाळांना थर्मल गन ऑक्सिमिटरचा पुरवठा केला नाही. त्यामुळे ऐनवेळी शाळांनी कसे तरी साहित्य उपलब्ध केले. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश न पाळता कोरोनाच्या महामारीत हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
भारत बंदचाही उपस्थितीवर परिणाम
८ तारखेला भारत बंद आंदोलनाची बातमी पसरल्यामुळे मुलांनीही शाळेत येण्यास टाळाटाळ केली. तर ग्रामीण भागात कपाशी वेचण्याचे काम सुरू असल्यानेही विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे बोलले जाते तर काही पालकांनी भीतीने मुलांना शाळेत पाठवणे टाळले.