शेती मातीच्या, राजकीय, सामाजिक, प्रेमावरील हास्य विडंबनात्मक कवितांचा अनोखा उत्सव
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात १६ फेब्रुवारी रोजी “प्रेमाचा जांगड गुत्ता” फेम नारायण पुरी, दंभस्फोटक कवी भरत दौंडकर यांच्या उपस्थितीत अहिराणी, मराठी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे रविवारची सायंकाळ ही अमळनेरकरांसाठी हस्स्याची ठरणार आहे.
शिवशाही फाऊंडेशन (अमळनेर) व खान्देश साहित्य संघ (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंकाळी सहा वाजता येथील जीएस हायस्कूलच्या आयएमए हॉलमध्ये अहिराणी व मराठी काव्यांचे “हास्य कवी संमेलन” होणार आहे. या संमेलनात “प्रेमाचा जांगड गुत्ता” फेम प्रसिद्ध कवी, चित्रपट गीतकार तथा अभिनेते नारायण पुरी (तुळजापूरकर) व प्रसिद्ध सामाजिक दंभस्फोटक कवी भरत दौंडकर (पुणे)यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी खान्देशातील कवी ही आपल्या अहिराणी कविता सादर करणार आहेत. ते शेती मातीच्या, राजकीय, सामाजिक आणि प्रेमावरील हास्य विडंबनात्मक कवितांचा अनोखा उत्सव साजरा करणार आहेत. या कविसंमेलनाचे उद्घाटन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या हस्ते होणार आहे. शिक्षक नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विपिन पाटील प्रमुख पाहुणे राहतील. कविसंमेलनाला उपस्थित रहावे असे आवाहन शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, खानदेश साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, शिवशाही फाऊंडेशनचे सचिव उमेश काटे यांनी केले आहे.
खान्देशातील हे कवी होणार सहभागी
यात कवी तथा गझलकार प्रा. सदाशिव सूर्यवंशी (धुळे), प्रसिद्ध हास्य कवी कुणाल पवार (लोंढावे), कवयित्री तथा गायिका प्रियंका पाटील (नवापूर) अहिराणी कवी रमेश धनगर (गिरड) प्रसिद्ध कवयित्री तथा साम टीव्हीच्या वृत्तनिवेदिका प्राची साळुंखे (चोपडा) गझलकार तथा कवी शरद धनगर (करणखेडा) यांचा समावेश आहे.