शिक्षकांच्या सत्कारप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे मत
अमळनेर (प्रतिनिधी) दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रातील अडचणी वाढत चालल्या असून ५ वीचा वर्ग प्राथमिक शाळेला जोडणे, शालार्थ आयडी आदी प्रश्न शिक्षक व संस्थांना अडचणीत आणणारे ठरले आहेत, असे मत पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अमळनेर येथे आयोजित शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
अमळनेर येथील सानेगुरुजी विद्यालयाच्या सभागृहात शिक्षक संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार व अडचणी जाणून घेण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. तांबे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शाळांना सरसकट अनुदान मिळावे आणि संस्थांना देखील अनुदान मिळावे अशी अपेक्षा आहे. राज्यात एकही शाळा विना अनुदानित राहणार नाही यासाठी शासनाचे धोरण आहे व प्रयत्न सुरू आहेत. निवृत्त शिक्षकांचे पेन्शन, रिक्त पदे भरणे, २००५ पूर्वीच्या विनाअनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, वाढीव तुकड्या, माध्यमिक शाळांना १२ वीपर्यंत वर्ग जोडणे आदींबाबत निवेदने प्राप्त झाले आहेत. त्यावर अधिवेशन अथवा शिक्षण मंत्र्यांकडे चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी संस्थाचालक जयवंतराव पाटील, धनगर पाटील, तिलोत्तमा पाटील, मुख्याध्यापक संघटना अध्यक्ष एम. ए. पाटील, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष संजय पाटील, क्रीडा शिक्षक संघ अध्यक्ष सुनील वाघ, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, रवींद्र पाटील, शरद शिंदे, पी. डी. पाटील, युवा क्रीडा शिक्षक संघाचे निलेश विसपुते, सानेगुरुजी पतपेढीचे चेअरमन के. यु. बागुल, मुख्याध्यापक एस. डी. देशमुख , बन्सीलाल भागवत, हमीद मास्तर, संजय बोरसे, व्ही. जी. बोरसे, जावेद खाटीक, राहुल बहिरम उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी केले.
आमदार तांबे यांना या मागण्यांचेही दिले निवेदन
या वेळी मुख्याध्यापक व माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, टीडीएफ, नगरपालिका निवृत्त संघ, नपा प्राथमिक शिक्षक संघ , समाजकार्य महाविद्यालय संघटना, शिक्षण संस्थाचालक संघटना, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, उर्दू शिक्षक संघटना आदींतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच क्रीडा शिक्षक संघटना पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.