सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाल्याने पोलिसांनी ठोकला बेड्या
अमळनेर (प्रतिनिधी) चक्क तहसील कार्यालयाच्या आवारात उभी केलेली अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांची १० चाके चोरून नेल्याचा अजब प्रकार रविवारी २२ रोजी घडला. मात्र चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने सहज पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. यातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध वाळू वाहतूक करणारे अफजल इब्राहीम, सौरभ पाटील , भैय्या पाटील यांच्या मालकीचे तीन टेम्पो आणि इतर ८ टेम्पो आणि ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आली आहे. २२ रोजी संध्याकाळी प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि तहसीलदार मिलिंद वाघ हे घरी गेल्यानंतर गेट उघडे असल्याने चोरट्यांनी थेट या वाहनांची चक्क १० चाके चोरून नेली. तहसील आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. याचे भान चोरट्यांना नसल्याने त्यांनी धाडस करीत हे चाके लांबवली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मिलिंद वाघ यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोघांची ओळख पटली आहे. पोलिसांना बोलावून त्यांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत.