सरकारी कामात अडथला आणणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) वाहतूक नियंत्रण करीत असताना अडवल्याने होमगार्डच्या कानशिलात लगावून एकाने पोलिसाचीही कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा केल्याच घटना शनिवारी २१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील सुभाष चौक ते पाच कंदील चौकदारम्यान घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील सुभाष चौक ते पाचकंदील चौकदरम्यान शनिवारी वाहतुकीची कोंडी झालेली असताना होमगार्ड नीलेश दिलीप मराठे हे वाहतूक नियंत्रण करत होते. या वेळी पानखिडकी भागातील रहिवाशी इस्माईल जहुर पठाण उर्फ इस्माईल खड्डा याने अचानक येऊन नीलेश मराठे यास तू पोलिसांचा ड्रेस का घातला, तुझे ओळखपत्र दाखव म्हणत कानशिलात मारली, ही घटना पाहताच पोलिस ललित पाटील व इतर जण त्याला आवरू लागले त्यांने पोलिस ललित पाटील यांचीही कॉलर पकडली. याप्रकरणी होमगार्ड मराठे यांच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक पाडवी करीत आहेत.