अमळनेर (प्रतिनिधी) एका गुन्ह्यात साक्ष दिल्याने महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील तांदळी येथे १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रेखाबाई परदेशी ह्या तांदळी येथे पती व मुलीसह राहून शेती व्यवसाय करतात. त्याच्या घरासमोर राहणारा निलेश परदेशी हा आधी ही एका गुन्ह्यात आरोपी असून त्यावेळी रेखाबाई यांनी साक्ष दिली होती. आरोपी हा गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शिवीगाळ करत साक्ष बदलवून टाक अन्यथा तुझे घर बरबाद करुन टाकेल, अशी धमकी देऊन गेला होता. त्यानंतर दि. १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पुन्हा तो रेखाबाईंच्या घरासमोर आला. शिवीगाळ करत धमकी देवू लागला. तिचे पती संजय परदेशी यांनी निलेशला शिवीगाळ का करत आहे, असा जाब विचारला असता त्याने त्यांनाही शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी रेखाबाईचे जेठ व जेठानी यांनी त्यांची सोडवणूक केली. त्यावेळी ही निलेश याने आई बहिणीवरून शिवीगाळ करत तू कोठे ही गेली तरी माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी रेखाबाई परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात भादंवि कलम २९४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे आरोपी निलेश विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भास्कर चव्हाण हे करीत आहेत