ग्रामपंचायत आणि नगरपालिकाच शाळांना पुरवणार कोरोना साहित्य

जिल्हाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांच्या पत्राने शाळांची चिंता मिटली

अमळनेर (प्रतिनिधी)  इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यानंतर शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांची रोज तपासणी करण्यासाठी  सर्व साहित्य स्थानिक प्रशासन ग्रामीण आणि शहरी यांनी उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी १९ नोव्हेंबर रोजी दिले आहेत. त्यामुळे शाळांची चिंता मिटली आहे.
कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने राज्य शासनेने नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शिक्षकांना कोरोना चोचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातही आधी अँटीजेन टेस्टनंतर आरटीपीसीआर टेस्ट आणि त्यांनतर शिक्षकांची ऑक्सिमिटर व थर्मल गनने तपासणी केल्यानंतर कोविडची लक्षणे आढळल्यास आरटीपीसीआर टेस्ट करावी. लक्षणे नसल्यास अँटीजन टेस्ट करावी, असे आदेश आल्याने प्रत्येक पत्रामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी आणि १० वीचे वर्ग सुरु करताना त्यांच्यात सुरक्षित अंतर एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शाळा निर्जंतुकीकरण करून शिक्षकांची तपासणी करावी लागणार आहे. याव्यतिरिक्त नव्या आदेशानुसार शिक्षक आणि विद्यार्थी यांची दररोज थर्मल गन आणि ऑक्सिमिटरने तपासणी करावी लागणार आहे. त्यात काही लक्षणे आढळल्यास लगेच त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे.


 
सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शाळा सुरू करा

अमळनेर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शाळांनी आपापल्या ग्रामपंचायती व नगरपालिका यांच्याकडून साहित्य उपलब्ध करून नियमाचे पालन करून शाळा सुरू कराव्यात आणि विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घ्यावी. राजेंद्र महाजन , गटशिक्षणाधिकारी , पंचायत समिती अमळनेर


शाळांना ऑक्सिमीटर, थर्मल गन पुरवण्याचे ग्रामपंचायतींना आदेश

 
अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी त्या परिसरातील शाळांना ऑक्सिमिटर व थर्मल गन आणि सॅनिटायझर पुरवण्याचे आदेश दिले आहेत. संदीप वायाळ , गटविकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *