अमळनेर (प्रतिनीधी) जुलैपासून पेन्शन नसल्याने ज्येष्ठ शिक्षक हवालदिल झाले असून ते त्वरित मिळावे, या मागणीसाठी अमळनेर नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या वंचित पेन्शन धारक शिक्षकांनी आमदार अनिल यांची भेट घेऊन गार्हाणी मंडळी. तर त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.
गेल्या पाच महिन्यापासून आम्ही वेतनाविना असताना आमच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत,पालिका अधिकारी व पदाधिकारी लक्ष देत नाही,शिक्षण मंडळाचे सभापती नितीन निळे व उपसभापती चेतन राजपूत हे देखील न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरत नाहीत मग आम्ही न्याय मागायचा तरी कुणाकडे अशी भावना आमदारांकडे या पीडित निवृत्त शिक्षकांनी व्यक्त केली.यावेळी त्यांच्यासोबत नागरी हित दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार उपस्थित होते.
पुढील अनुदानातून व्यवस्था करण्याची मुख्याधिकाऱ्यांनी दिली ग्वाही
आमदार अनिल पाटील यांनी वयोवृद्ध शिक्षकांच्या भावना लक्षात घेत नगराध्यक्षांशी याबाबत चर्चा करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. तसेच तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधल्यानंतर नपच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना देखील विलंबाची कारणे विचारून या प्रकाराबाबत खंत ही व्यक्त केली. मुख्याधिकारी यावर निरुत्तर असताना त्यांनी नगराध्यक्षांशी चर्चा करून पुढील महिन्याच्या अनुदानातून शिक्षण मंडळास अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही दिली.