शेतीत पाय ठेवल्यास मारून टाकण्याची दिली धमकी, सहा जणांवर गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे शेती करण्याच्या वादावरून दोन गटात दंगल उसळली. यात सहा जणांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून ५ जणांना जखमी केले. तसेच शेतीत पाय ठेवल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे
किरण प्रकाश कोळी हे ८ रोजी ७ वाजता घरी असताना गावातीलच प्रजून राजधर कोळी, नारायण भिवंसन कोळी , चांदनबाई नारायण कोळी ,मंगलाबाई राजधर कोळी व खामखेडा (ता. शिंदखेडा) येथील संजय राजेंद्र कोळी, राजू गोदाराम कोळी हे अंगणात येऊन दमबाजी करू लागले की तुम्ही शेतीत पाय ठेवू नका. शेती आमची आहे. तुम्हाला मारून टाकू त्यावेळी किरणची आई पुष्पबाई कोळी यांनी शेती आमची असल्याची सांगितल्यानंतर त्यांनी आई वडिलांना काठयांनी मारहाण करणे सुरू केले. तसेच किरणलाही खांद्यावर पायावर मारहाण केली. तसेच पुष्पबाईचे केस धरून ओढाताण करू लागले. यात पुष्पाबाईचे ७ ग्राम सोन्याचा गळ्यातील दागिना आणि ३५ हजार रुपये रोख कुठेतरी पडले. त्यावेळी चुलत भाऊ सागर कोळी , काका नाना अर्जुन कोळी व काकू संगीताबाई कोळी हे भांडण सोडवायला आले असता आरोपींनी सागरच्या डोक्यावर काठी मारून रक्तबंबाळ केले. तर नाना कोळी यांना डोळ्यावर व संगीताबाई यांना पाठीवर काठीने मारहाण करून जखमी केले. किरणच्या फिर्यादीवरून मारवाड पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत.