सर्व राज्यातून ७० स्पर्धकांमधून शीतल पवार यांनी प्रत्येक फेरीत घेतली आघाडी
अमळनेर (प्रतिनिधी)सनराईझ व्हिजन एन्टरटेन्मेंटतर्फे आयोजित मिसेस इंडिया स्पर्धेत मालपूर येथील माहेर तसेच मठगव्हाण येथील सासर असलेल्या शीतल पवार यांनी मिसेस इंडिया स्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावला. यामुळे सौंदर्य क्षेत्रात देखील अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सनराईझ व्हिजन एन्टरटेन्मेंटतर्फे एरोसिटी नवीदिल्ली येथे मिसेस इंडिया स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी सर्व राज्यातून ७० स्पर्धक पात्र झाले होते. त्यातून अंतिम फेरीसाठी ४० स्पर्धक निवडले गेले होते. अंतिम फेरीत रॅम्प वॉक , टॅलेंट आणि प्रश्नोत्तराच्या फेरी आयोजित केली होती. त्यात जोधपूरच्या नितु भट्ट प्रथम, महाराष्ट्राच्या मूळ अमळनेर तालुक्याच्या रहिवाशी शीतल देविदास पवार यांनी द्वितीय तर चंदिगढच्या रागिणी कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून सेलिब्रिटी आदिती गोवित्रीकर यांनी काम पाहिले. डॉ. स्वाती दीक्षित आणि प्रशांत चौधरी यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. उमेश दत्त व अशोक सावने यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विवाहित महिलांच्या व्यक्तिमत्व सौंदर्य मिसेस इंडियाय स्पर्धेत अमळनेरच्या ग्रामीण भागातील रहिवाशीला पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.