आशिया खंडातील ११ हजार स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून खान्देशाचे नाव केले उज्ज्वल
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील युवकाने वरळी येथील सुप्रसिद्ध इंडिया फिल्म प्रोजेक्ट या कंपनीने घेतलेल्या स्पर्धेत अवघ्या ५० तासात गाणे लिहून ,संगीतकारकडून संगीतबद्ध करून गायकामार्फत गावून आशिया खंडातील 11 हजार स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून खान्देशाचे नाव संगीत क्षेत्रात उज्ज्वल केले आहे.
मुंबई वरळी येथील सुप्रसिद्ध इंडिया फिल्म प्रोजेक्ट या कंपनीने आशिया खंडातील नवोदित कलाकारांसाठी यंदा प्रथमच फिल्म मेकिंग सोबत ‛ ५० हावर्स म्युझिक चॅलेंज ’ स्पर्धेचे आयोजन केले होते. यात आशिया खंडातील नामवंत कलाकारांनी सुमारे तीन हजार गाणे सादर केली होती. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील रॉकिंग गाईज ग्रुपच्या ग्रामीण भागातील टाकरखेडा येथील युवक सचिन पाटील याने ‛एक तुटता हुवा तारा’ गीत लिहिले आणि मुंबई स्थित अंकुश बोरडकर यांनी गाण्याला संगीतबद्ध केले तर मूळ जळगावचे असलेले गोपाळ ठाकरे यांनी हे गाणे गायले. या सर्वोच्च स्पर्धेत या गीताने ‛प्लॅटिनम सॉंग ऑफ द इयर’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे .त्यामुळे लवकरच १६० म्युझिक ऍपवर हे गाणे अपलोड करण्यात येऊन विविध दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवण्यात येणार आहे. या गीताच्या माध्यमातून प्रथमच युवकांमुळे संगीत क्षेत्रात खान्देशाला मोठा सन्मान मिळाला आहे.
अशी होती स्पर्धेची काठिण्य पातळी
या स्पर्धेत लोककलेवर आधारित ज्यात रॉक , पॉप, इलेक्टरोनिक्स संगीत प्रकारात ५० तासात स्वतः गाणे लिहून त्याला संगीतबद्ध करून गायकाच्या आवाजात ऑनलाईन सादर करायचे होते. विशेष म्हणजे या गाण्यात एक हिंदी पुस्तकाचे नाव आले पाहिजे, अशी अट होती. तरीही सचिन पाटील याने चॅलेंज स्विकारून यश मिळवले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.