दररोज किमान ५ ते ६ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात देताय अँटीरेबिज इंजेक्शन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी दिवसरात्र धुमाकुळ घालत दहशत निर्माण केली आहे. यामुळे नागरिकांना या कुत्र्यांपासून बचावसाठी जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. तालुक्यात गेल्या एकाच महिन्यात सुमारे १२३ लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींचे कुत्र्यांनी लचके तोडले आहे. यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
अमळनेर शहरात गांधलीपुरा, ताडेपुरा, पणखिडकी, तांबेपुरा, रामेश्वरनगर, ताडेपुरा, सिद्धीविनायक कॉलनी यासह इतर व ग्रामीण भागात पळासदळे, सुंदरपट्टी, गांधलीपुरा, देवळी, चौबारी, ढेकू अंबासन, सडावण, भिलाली, झाडी, भरवस, कळमसरे, नांदगाव, खोकरपाट, गलवाडे , खडके, सारबेटा, मंगरूळ, शिरसाळे यासह अनेक गावांना मोकाट आणि पिसाळलेले कुत्रे असून गेल्या ३० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान तब्बल १२३ जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉ. प्रकाश ताळे, डॉ. जी. एम. पाटील यांच्यासह कर्मचारी दररोज ५ ते ६ रुग्णांना अँटीरेबिज इंजेक्शन देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पिसाळलेले, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.