अमळनेर (प्रतिनिधी) कायद्याला न जुमानता भरवस ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून हरभरा पेरून उलट ग्रामसेवक आणि ग्रापंचायत पदाधिकाऱ्यांना धमकणाऱ्या एका व्यक्तिविरुद्ध मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील भरवस येथे गट नंबर २८२ ,२८३ हा गट ग्रामपंचायत मालकीची गायरान जमीन आहे. १ नोव्हेंबर रोजी रमेश देविदास मालचे याने तेथील काटेरी झुडुपे काढून ग्रामपंचायतीच्या जमिनीवर हरभरा पेरला. ही माहिती मिळताच ग्रामसेवक विनोद पाटील, सरपंच अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, दयाराम भिल, शिपाई समाधान पांचाळ, पोलिस पाटील काशिनाथ पाटील, लोण पंचमचे पोलिस पाटील राजेंद्र बिडकर, ग्रामस्थ उमेश पाटील, गणेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन त्यास विचारले व पंचनामा केला असता रमेश मालचे याने आदिवासींना जमीन कसण्याचा अधिकार आहे. तुम्ही याविरोधात कोर्टात सिद्ध करून दाखवा तर मी जमीन सोडून देईन नाहीतर तुमच्या विरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिली आणि मी तुमचा कायदा मानत नाही एसी सरकारचा कायदा मानतो, असे म्हणून धमकी दिली. याप्रकरणी ग्रामसेवक विनोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश मालचे विरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत.