प्रवीण महाजन यांनी दिली शाळेला ११० पुस्तके भेट
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर येथील के.पी.सोनार माध्यमिक विद्यालयात वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. पुणे येथील युवकमित्र परिवार संस्थेचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी शाळेला ११० पुस्तके भेट दिले.
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती, राष्ट्रीय एकता दिन, महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल, वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून देत सरदार पटेलांचे विचार अमलात आणण्याचे आवाहन प्रमुख मान्यवरांनी केले. कार्यक्रमास रवींद्र पाटील, सावन परदेशी, धीरज चौधरी, संदीप पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मुकेश अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन सी.आर जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक के.डी. हटकर, शिक्षिका पी.आर.पाटील, एस.डी. मोरे यांचे सहकार्य लाभले.