फोटोग्राफर जयवंत ढवळे (JD) यांच्या जीवनात घडली एखाद्या चित्रपटा सारखी घटना
अमळनेर (प्रतिनिधी)सर्वांच्याच दुःखावर आपल्या विनोदी स्वभावाने हास्य फुलणारा आणि स्माईल म्हणत आठवणींचा अल्बम तयार करणारा फोटोग्राफर जेडी ऊर्फ जयवंत ढवळे गेल्या तब्बल एक महिन्यापासून डोक्याला मार लागल्याने मृत्यूशी झुंज देत होता. सुरवातीला डॉक्टरांनीही आशा सोडली होती.. मित्रांनीही श्रद्धांजली वाहिली होती.. अंत्यसंस्काराची तयारीही झाली होती.. यमानेही सारा बंदोबस्त करून ठेवला होता.. पण या अवलियाने त्यालाही हरवत खऱ्या अर्थाने ‘जयवंत’ असल्याचे सिद्ध करीत १ नोव्हेंबर रोजी घरी परतत आहे.
एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी सारखे अमळनेर मधील फोटोग्राफर जयवंत ढवळे यांच्या जीवनात जीवघेणी घटना घडली आणि ते मृत्यूच्या दाढेतून बाहेरही आले. त्यांच्या कहाणीचा फ्लॅशबॅक पाहता ते नेहमीप्रमाणे ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ वाजता फिरायला गेले होते. अचानक डोक्याला मार लागला अन ते खाली पडले. काय झाले हे समजण्याच्या आत ते बेशुद्ध झाले. अर्ध्या तासानंतर लोकांची गर्दी जमली डोक्यातून भळाभळा रक्त वाहत असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मेंदूला मार लागल्याने पुढील उपचारासाठी धुळ्याला पाठवण्यात आले तेथे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. परिस्थिती बघून डॉक्टरांनी तो बराच होऊ शकत नाही, असे सांगितले प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व रिपोर्ट मुंबई ,पुणे येथील डॉक्टरांना दाखवण्यात आले. त्यांनीही केस हाताबाहेर गेली असल्याचे सांगितले. 4 रोजी परत अमळनेर आणण्याची तयारी सुरू झाली काही वेळात प्राण जातील असे सांगण्यात आले. रुग्णवाहिकेने अमळनेर आणण्यात आले. इकडे सर्वांचा हसरा विनोदी परखड मित्र गमावला म्हणून सोशल मीडियावर त्याचे श्रद्धांजली संदेश सुरू झाले होते. पालिकेत त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात येऊन अंत्यसंस्काराची पावती फाडण्यात आली. घरासमोर तिरडी रचण्यात येत होती. अमळनेर येईपर्यंत जयवंतचा श्वास सुरू होता म्हणून अखेर सरळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
साडे तीन लाख रुपये गोळा करून उपचार
ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर जसे बेडवर टाकले तसा त्याचा श्वास अधिक गतीने सुरू झाला. ज्याच्या मरणाची वाट पाहत होते. त्याच्यावर पटकन उपचार करा, म्हणून भांडणे सुरू झाली. पैसे नसतील तर आम्ही सारे गोळा करू म्हणून अमळनेरकरांनी पुन्हा त्याला धुळे येथे शस्रक्रिया करण्यासाठी रवाना केले. जयवंत अधिकच प्रतिसाद देऊ लागल्याने डॉक्टरांच्या आशा पल्लवित झाल्या अमळनेर मधील सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार , विविध मित्रपरिवार यांनी वर्गणी गोळा केली तब्बल साडे तीन लाख रुपये गोळा करून उपचार सुरू झाले आणि महिन्याभरात तो पूर्ण बरा झाल्याने डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला 1 रोजी जयवंत अमलनेरला त्याच्या घरी येत आहे.