पत्नीला गैरहजर राहण्याच्या नोटीसा दिल्याचा राग आल्याने केले गैरवर्तन
अमळनेर (प्रतिनिधी) सफाई कर्मचारी असलेल्या पत्नीला गैरहजर राहण्याच्या नोटीसा दिल्याचा राग आल्याने माजी नगरसेवकाने नगरपालिकेच्या मुकादमला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगरपालिका सफाई कर्मचारी सीता चव्हाण या वारंवार कामावर गैरहजर राहतात म्हणून मुकादम राजू ओंकार संदानशीव यांनी त्यांना नोटिसा दिल्या होत्या. त्याचा राग आल्याने त्यांचे पती व माजी नगरसेवक जय चव्हाण यांनी बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मुकादमशी वाद घालून धक्का बुक्की केली. संदानशीव यांनी ही घटना वरिष्ठांच्या कानावर टाकून उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्ह दाखल केला असून तपास सहा पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत.