अमळनेरातील सेतू केंद्र चालकाचा महाप्रताप, फसवणुकीचा गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी)चक्क प्रांत अधिकार्यांनी मंजूर केलेल्या दाखल्यावर हेराफेरी करून टोकरे कोळीना एस टी प्रवर्गात दाखवून बनावट दाखले देण्याचा सेतू केंद्र चालकाचा प्रताप उघड झाला आहे. अवघ्या २० हजार रुपयात जातीचा प्रवर्ग बदलण्याचा गोरख धंदा लक्षात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोळी समाजाचे एसबीसी प्रवर्गाचे दाखले मंजूर करून त्यांना एस टी प्रवर्गात टोकरे कोळी दाखवून शासनाची व ग्राहकांची फसवणूक केल्याचा कारनामा रफिक जब्बार शहा (रा नांद्री) या सेतू चालकाने केला आहे. त्याच्याकडे भूषण गोपीचंद कोळी हे त्यांचे नातेवाईक राहुल प्रकाश सैंदाने , सुनील प्रकाश सैंदाने , शामलाल ज्ञानेश्वर सैंदाने यांचे टोकरे कोळी समाजाचे दाखले बनवण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी गेले होते. त्यावेळी रफिक शहा याने त्यांच्याकडून प्रत्येकी २० हजार प्रमाणे ६० हजार रुपये घेतले. संबंधितांचे एसबीसी म्हणजे विशेष मागासवर्ग जातीचा दाखला प्रस्ताव उपविभागीय कार्यालयात पाठवण्यात आला. ऑनलाइन कागदपत्रे तपासून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी डिजिटल सही देऊन एसबीसी दाखले दिले. मात्र रफिक याने एसबीसी दाखले देण्याऐवजी तिघा ग्राहकांना अनुसूचित जमातीच्या म्हणजे एस टी प्रवर्गातील टोकरे कोळी जातीचे दाखले बनवून दिले. मूळ दाखल्यात हेराफेरी करून लाभासाठी जातीचा प्रवर्ग बदलवून टाकल्याचे उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या लक्षात आले. त्यांनी सखोल तपासणी केली असता बनावट दाखल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र चौधरी याना प्राधिकृत करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
या कलमान्वये असा झाला गुन्हा दाखल
नायब तहसीलदार चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रफिक शहा विरुद्ध फसवणूक , कागदपत्रात हेरफिरी केली म्हणून भादवी ४२०, ४६८ , ४७१, ४७६ आणि पासवर्ड मिळवून किंवा ऑनलाईन घोटाळा करून प्रमाणपत्र दिले म्हणून माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ च्या कलम ६६ क , ६६ ड प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहेत.
.