अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे, डांगर, रणाईचे, पिंगळवाडा येथील सुमारे १६६ वंचित आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड मिळावे यासाठी लोक संघर्ष मोर्चातर्फे अमळनेर तहसिलदार कार्यालयात पहिल्या टप्प्यातील अर्ज दाखल करण्यात आले. त्यावर त्वरित कार्यवाही होऊन रेशन कार्ड मिळून नागरिकांना लाभ मिळणार आहे.
सुप्रिम कोर्टाने आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत निकाल दिलेला आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशनुसार लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील १५४ गावात वंचित आदिवासी कुटुंबांना विनामुल्य रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत नियोजनानुसार गावा गावात आदिवासी कुटुंबाचे सर्वेक्षण करून फार्म भरण्याचे काम चालू आहे. त्या पैकी आज गुरुवार रोजी पहिल्या टप्प्यातील तालुक्यातील जानवे, डांगर, रणाईचे, पिंगळवाडा येथील सुमारे १६६ लाभार्थ्यांचे रेशनकार्ड मिळावे यासाठी लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे, शांताराम सोनवणे, अविनाश पवार, उदयभान पारधी, कल्पना पारधी, नितीन साळूंके, हेमंत दाभाडे यांनी विहित नमुन्यात भरलेले अर्ज पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संतोष बावणे यांच्या ताब्यात दिले.