अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित दगडी दरवाज्याच्या दुरुस्तीसाठी नगरपालिकेतर्फे १ कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपयाच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येथून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून धुळे चोपडा राज्य मार्ग रुंद होण्याची अडचण दूर झाली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
अमळनेर येथील ऐतिहासिक दगडी दरवाजा (वेस) जीर्ण झाल्यामुळे वर्षभरापूर्वी पूर्वेकडील बुरुज कोसळला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून धुळे चोपडा राज्य मार्गावरील वाहतूक बंद होती. दगडी दरवाजा हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने दुरुस्तीसाठी या विभागाकडिल निधीच्या उपलब्धतेनुसार काम होणार होते. मात्र आर्थिक अडचण व विभागाचे नियम यामुळे अमळनेरकरांची चांगलीच कोंडी होत होती. म्हणून हा दरवाजा(वेस) पुरातत्व विभागाच्या ताब्यातून घेऊन नगरपालिकेने त्याची देखभाल दुरुस्ती करण्याबाबत माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सूचना केली होती. त्यानुसार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व नगरसेवकांनी ठराव करून पुरातत्व विभागकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार नाशिक विभागाचे पुरातत्व विभागाचे संचालक तेजस मदन गर्गे यांनी दगडी दरवाजा वेस ही राष्ट्रीय स्मारक यादीतून वगळून देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडे देण्याची शिफारस केली होती. पुरातत्व विभागाने त्याची परवानगी दिल्यानंतर अटी शर्तीं अधीन राहून या वास्तूचा ताबा पालिकेकडे हस्तांतरित केला आहे. या दरवाज्याच्या दुरुस्तीसाठी ९ महिन्यांच्या मुदतीवर सुमारे १ कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपयाच्या कामाचे आदेश अमन कन्स्ट्रक्शनला माजी आमदार साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड ,विनोद लंबोळे ,संजय चौधरी , अभियंता संजय पाटील , ठेकेदार चेतन शहा , अभियंता चेतन सोनार ,शीतल देशमुख ,बाबू साळुंखे , नरेंद्र संदानशीव , महेश जोशी, मिलिंद चौधरी उपस्थित होते.