१८७ दिवस डॉक्टरांची टिम करतेय “विजय” वर अभ्यास, देवाच्या कृपेने अजून सुरक्षित
राष्ट्रीय कार्यात सहभागाचा आनंद असल्याच्या खबरीलालशी बोलताना व्यक्त केल्या भावना
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाने लाखो लोकांची जीव घेतला आहे…मग त्याचा जीव घेण्यासाठी लसीच्या संशोधनाकरीता देशाचे संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहे… तर मानवावर या लसीच्या चाचणीचा प्रयोग करताना काहीही बरेवाईट परिणाम होण्याची शक्यता असल्याने सहजासहजी ही लस घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही…तर मला चालून आलेली संधी मी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून स्वीकारली.. आणि लसीचा पहिला डोस घेतला असून १८७ दिवस डॉक्टरांची टिम माझ्यावर अभ्यास करणार असून लसीचे माझ्यावर जे परिणाम होतील ते होतील, पण राष्ट्रीय कार्यात आपण कामाला आलो, याचे समाधान मनाला आनंद देत असल्याच्या भावना अमळनेरचा भूमीपुत्र विजय संजय पाटील यांनी ‘खबरीलाल’शी बोलताना व्यक्त केल्या.
विजय हा अमळनेर तालुक्यातील तळवाडे येथील भूमिपूत्र आहे. सध्या तो पुण्यात एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरीत करीत आहे. तो अविवाहित असून घरी आईवडिल, लहान भाऊ आहे. तसेच तो ग्रामपंचायतीचा माजी सदस्यही आहे. एमडी करीत असलेल्या मित्राच्या सल्ल्याने तो काही दिवसापूर्वी भारती हॉस्पिटलमध्ये गेला होता. तेथेच त्याला डॉक्टारांनी या चाचणीविषयी माहिती दिली. गावी घरी आईवडिलांना याची माहिती दिली. त्यांनी या चाचणीसाठी सहाजिकच विरोध दर्शवला. पण राष्ट्रहितही तेवढेच महत्त्वाचे असल्याने “मन की बात” सुनकर थेट लसीची चाचणी करण्यास परवानगी दिली.
विजय म्हणाला, असच एक दिवस अचानक भारती हॉस्पिटलला गेलो होतो. तिथे एक डॉक्टर भेटले ते म्हणाले, जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यावर ऑक्सफर्ड आणि सिरम कंपनी लस तयार करतेय आता तिची टेस्टिंग मानवी शरीरावर करायची आहे आणि यासाठी आपल्याला १८ ते ४५ वयोगटातील लोकांवर चाचणी करून हे संशोधन पूर्ण करायचे आहे. हीच लस भारतामध्ये ती कोव्हिशील्ड या नावाने उपलब्ध होईल.
तर तुम्ही यात सहभागी व्हाल का, असे त्यांनी थेट विचारले. त्यांच्या बोलण्यानंतर मी थोडा थबकलो, विचार करतो म्हणून सांगितले. त्यानंतर डोक्यात विचारांचे काहूर माजले, मन स्थिर आणि शांत करीत काही सेकंदात विचार केला की जर आपण यात सहभागी झालो आणि ही लस यशस्वी झाली तर कोट्यवधी लोकांचे आज जीव वाचतील, आपण उपाशी राहिले तरी चालेल पण जगाचा पोशिंदा होता आले पाहिजे, या शेतकरी कुटुंबातील संस्काराप्रमाणेच आपण मेलो तरी चालेल पण राष्ट्राच्या कामी आलो पाहिजे, म्हणून क्षणाचा ही विलंब न करता डॉक्टरांना हो सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनीही माझ्यातला विश्वास आणि पॉझिटिव्ह एनर्जी पाहून या चाचणीविषयी सविस्तर माहिती दिली. यात जर का तुम्हाला काही झाले तर सरकारकडून तुम्हाला विमा असेल. तसेच प्रकृती बिघडली तर येथेच तुमच्यावर उपचार केले जातील, असे सांगितले. त्यावर मीही त्यांना चाचणीसाठी तयार असल्याचे सांगितले. नंतर त्यांनी माझ्याकडून रितसर काही अर्ज भरून घेतले. घरात किती लोक असतात अशी विचारपूस करीत, कौटुंबिक माहिती घेतली. लस घेण्यास होकार दिल्यानंतर माझी कोरोनाची आणि रक्ताची टेस्ट घेण्यात आली. तसेच अन्य आवश्यक असलेल्या विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट आल्यावर लस देण्यासाठी बोलवण्यात आले आणि काल मला लसचा पहिला डोस देण्यात आला. दुसरा डोस २८ दिवसांनी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी देणार आहेत. आता पुढील १८७ दिवस माझ्यावर डॉक्टरांचा स्टडी सुरू असणार आहे.
भारतात १६०० लोकांना देणार लस
जगभरात विविध देशांमध्ये कोरोना व्हायरसवरच्या लशीचं संशोधन सुरू आहे. यापैकी १० लशींच्या चाचण्या या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यात आलेल्या आहेत. या लशी परिणामकारक आणि सुरक्षित आहेत का हे तिसऱ्या टप्प्यात सिद्ध होणं महत्त्वाचं आहे.
सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी भारतभरातल्या १७ शहरांमध्ये केली जात आहे.
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटल, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि जहांगीर हॉस्पिटलमध्ये या ट्रायल्स नियोजित आहेत.
ऑक्सफर्ड आणि सिरम कंपनी तयार करीत असलेली लस ही भारतातील १६०० जणांना देऊन प्रयोग केला जात आहे. त्यात आतापर्यंत केवळ ९६ लोकांना ती दिली गेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १८ जणांचा समावेश आहे. तर खान्देशातील विजय या एकमेव तरुणाचा समावेश आहे. ती खान्देशवासींसाठी अभिमानाची बाब आहे. ही लस यशस्वी झाली तर कोट्यावधी लोकांचा जीव वाचणार आहे.
हाच खरा देशाचा ‘विजय’ असेल !
लस घेतल्याने काहीच झाले नाही तर उत्तम होईल आणि या देशावर आलेल्या संकटांत आपण काहींतरी योगदान दिले, याचे समाधान मनात राहील. कारण आजापर्यंत कोरोनामुळे लाखो लोकांचे जीव गेले आहे, याचे फार मोठे दुख होते. पण आपण काहीतरी चांगलं करतोय एवढंच मनात आहे. म्हणून कोणीही घाबरून नये, राष्ट्रकार्याच्या मदतीसाठी नेहमी प्रतिसाद देत राहा. ही टेस्ट जर यशस्वीपणे झाली तर सगळ्यांना ती दिली जाणार आहे आणि हाच खरा देशाचा ‘विजय’ असेल.
–विजय संजय पाटील, मूळ तळवाडे ह.मु. पुणे