कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मंजूर प्रोत्साहन भत्ता तात्काळ अदा करावा

शिष्टमंडळाने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन देऊन केली सविस्तर चर्चा

जाहीरात

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाव्यतिरिक्त मंजूर प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा मार्मिक समाचारचे प्रतिनिधी रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
कोरोना विषाणच्या वाढत्या संसर्गामुळे  अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून शासनाने अनेकविध उपाययोजना अंमलात आणल्या.याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून ग्रामीण व नागरी विभागातील अंगणवाडी सेविका मदतनिसांना कोरोनाच्या कामासाठी एप्रिलमध्ये नियुक्त्या दिल्या गेल्या.सदर नियुक्त्यांनुसार अंगणवाडी कर्मचारी आजतागायत कोरोनाचे काम करीत आहेत.म्हणून कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाव्यतिरिक्त प्रोत्साहन भत्ता द्यावा. अशी मागणी संघटनेने शासन स्तरावर लावून धरली होती. त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी शासकीय आदेश काढून कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाव्यतिरिक्त १०००/-रुपये प्रोत्साहन भत्ता १२,१३ आणि १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेच्या व्याजातून देण्यात यावा असे नमूद केले आहे. सदर आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता तात्काळ अदा करावा. अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना देऊन सविस्तर चर्चा केली.

भत्त्याची रक्कम तात्काळ अदा करण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

सदर चर्चेत प्रोत्साहन भत्त्याची रक्कम नियोजन करून तात्काळ अदा करण्यात येईल. असे ठोस आश्वासन मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिष्टमंडळात वंदना पाटील, सुचिता पाटील, संगिता पाटील,सुनिता नेतकर,पुष्पा सोनी,कल्पना पाटील,रत्नप्रभा पवार,हेमलता लाड,प्रतिभा पाटील,ज्योती पाटील,मनिषा चौधरी,ज्योती निकम सहभागी झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *