ईश्वर चिठ्ठीने तारल्याने भाजपाच्या हाती आली ग्रामपंचायतीची सत्ता
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एकलहरे येथे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी भाजपाच्या निलाबाई दिनकर पाटील यांची निवड झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व प्रस्तापिथ केले. संपरपंचपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान तीन -तीन मते मिळल्याने ईश्वर चिठ्ठीने निलाबाई पाटील यांना तारले आणि त्या सरपंचपदी विराजमान झाल्या.
तालुक्यातील बहुचर्चित एकलहरे येथील अतिक्रमण प्रकरणी सरपंच अपात्रते बाबत खंडपीठाने दिलेल्या अंतिम निर्णयाने सरपंच अपात्र झाल्याने येथे सरपंच पदाची निवडणूक लागली होती. सात सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच अपात्र झाल्याने सहाच सदस्य राहिले होते. यात दोन्ही गटाकडे तीन तीन सदस्य असल्याने खूपच चुरस निर्माण झाली होती. दि. ७ रोजी भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस दिलीप पाटील यांचा गटातर्फे त्यांची आई निलाबाई दिनकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दुसऱ्या गटातर्फे शितल सुनील पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजे तीन तीन मते पडल्याने शेवटी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात निलाबाई दिनकर पाटील या विजयी झाल्या. त्यांना संगीताबाई रविंद्र कोळी, रूपाबाई तानुक भिल या ग्राम पंचायत सदस्यांनी पाठिंबा दिला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी आर .पी .शिंदे यांनी काम पाहिले
त्यांच्या निवडीबद्दल आमदार स्मिता ताई वाघ, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, पंचायत समिती सभापती रेखाबाई पाटील, पंचायत समिती उपसभापती भिकेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या संगीताबाई भील, भाजपा तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रावसाहेब पाटील, परिसरातील सरपंच व पदाधिकारी एकलहरे येथील गावकरी यांनी त्यांचे स्वगात केले.