दोन्ही संशयित आरोपी धुळे येथील रहिवासी, पोलिसांची उत्तम कामगिरी
अमळनेर (प्रतिनिधी) चोपड्यातून दुचाकीने गावठी पिस्तुल घेऊन पळ काढलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत अखेर अमळनेर शहरात दोघांवर झडप घालत पोलिसांनी जेरबंद केले. दोन्ही संशयित आरोपी हे धुळे येथील रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध आर्म अॅक्टनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिसांनी राजेश गणेश गुरखा (रा. शिरूड ता. धुळे) आणि मलदरसिंग गुरुमुख सिंग शिकलकर (रा. साक्री रोड धुळे) याना ताब्यात घेतले आहे. चोपडा येथून दोन गुन्हेगार दुचाकीने गावठी पिस्तुल घेऊन पळून जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी लगेच ही माहिती अमळनेर पोलिसांना दिल्याने एपीआय प्रकाश सदगीर ,पोहे संजय पाटील ,पोहेकॉ भटूसिंग तोमर,पोहे सुनील हटकर , पो ना दीपक माळी , पोना. शरद पाटील , पोना रवी पाटील , हितेश चिंचोरे , प्रमोद पाटील , कैलास शिंदे , भूषण बाविस्कर आदींच्या पथकाने सापळा रचून दुचाकीवर (क्रमांक एमएच- ४१, एसी- १८९९) दोन जण ३५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा घेऊन पळून जाताना दिसले. पोलिसांनी चोपडा रेल्वे गेटपासून आपल्या वाहनाने या आरोपींच्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला होता.
… अखेर रवी पाटील यांनी घातली झडप
दोन्ही आरोपींचा पाठलाग सुरू असताना पोलिस कर्मचारी रवी पाटील दुचाकीने त्यांचा पाठलाग करत होते. हे दोन्ही आरोपी अमळनेर येथील दगडी दरवाज्याजवळून पळत असतांना पोलिसांची व्हॅन अडकली. यामुळे आरोपींचा अजून पळून जाण्याचा विश्वास वाढला. मात्र रवी पाटील यांनी आपली दुचाकी त्यांच्या मागे वेगाने पळवल्याने धांदरून दोन्ही आरोपी खाली पडले आणि त्यांच्यावर झडप घालण्यात आली. रात्री उशिरप्रयन्त गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.