अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिले पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी अमळनेर काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करून तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे.
तहसीलदार वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात २०२० ते २०२१ या वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील तीळ, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ऊस, केळी, मका ज्वारी, बाजरी, कांदा अशा सर्व पिकांचे नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. म्हणून लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा. जिल्ह्यातील २०१९ – २०२० या अर्थीक वर्षात पिक विमा मंजूर झालेला आहे परंतु जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम प्राप्त झालेले नाही, अशा तक्रारदार शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा मिळावी.
जिल्ह्यातील सन २०१८ – २०१९ चे फळबाग व इतर पिकांच्या काही शेतकऱ्यांच्या अनुदान प्राप्त झालेले नाहीत यासंदर्भात परित कार्यवाही होऊन अनुदान रक्कम मिळावी. उत्तर प्रदेशातील निर्भया या दलित  तरुणीवर अन्याय अत्याचार झाला आहे तिच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्यात आलेली आहे, त्यासंबंधीच्या अन्याय अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे व प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्यांवर कडक  कायदेशीर करण्यात यावी.

आमदार, माजी आमदारांनी घेतली भेट

यादरम्यान, आंदोलनाच्यावेळी आमदार अनिल पाटील यांनी भेट दिली. तर माजी आमदार साहेबराव पाटील, काँग्रेसच्या  महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश प्रधान पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, तालुका किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा,. सुभाष पाटील, अमळनेर तालुका रेशन समितीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, संतोष पाटील, जयवंतराव पाटील, गजेंद्र साळुंखे, प्रशांत संदानशिव, रहमान खाटीक, अहमद पठाण, प्रवीण जैन,  राजू शेख,  प्रमोद पाटील, प्रशांत पाटील, सईद तेली, तौसिफ  तेली, राजेंद्र भाट, मनोज बोरसे, डॉ रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *