राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात अतिपावसाने कापूस अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अथवा नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी केली आहे .
खाटीक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात सरासरी पाऊस ५८२.२० मिमी अपेक्षित असताना यंदा ७७१.६९ मिमी पाऊस पडला आहे. सुमारे १५० टक्के पाऊस झाला असून शेतातील पाणी जमिनीत जिरत नसल्याने शेतातील पिके सडू लागली आहेत. आधीच उडीद आणि मूग पिके हातची गेली आहेत. जेमतेम कपाशी सारख्या पांढऱ्या सोन्यामुळे दिलासा मिळेल व समतोल साधला जाईल अशी अपेक्षा असताना मात्र पावसाने धोका दिला आहे. खुले भूखंड , खोलगट जागांमध्ये पाणी साचले असून शेतशिवारात , जंगलात नाले वाहू लागले आहेत. अति पावसाने अंतुर्ली , रंजाने शिवारात कपाशीच्या कैऱ्या गळून पडल्या आहेत. तर पांढरा कापूस काळा पडू लागला आहे. कैऱ्या गळून पडल्याने उत्पन्न तर कमी येणारच आहे. त्यात जे हाती येणार होते ते देखील सडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अथवा नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी केली आहे.