वीज विभागातील “दीपक” पाण्यात विझला, पांझरेवरील तुटलेल्या फरशीने बळी घेतला!

पिळोदा येथील मूळ रहिवासी असलेला दिपक सध्या वडणी बुरझड येथे होता वास्तव्यास

अमळनेर (प्रतिनिधी)पांझरा नदीवरील फरशी तुटल्याने तोल जाऊन वीज कंपनीत हंगामी कामगार म्हणून काम करणार्‍या दीपकचा  मोटारसायकलसह पाण्यात पडल्याने बळी गेल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी घडली. तो आजी आजोबांचा आधार होता तर ७ ते ८ महिन्या पूर्वीच त्याचा विवाह झाला होता. तसेच तो बापही होणार होता. त्यामुळे निष्पाप अशा तरुणाचा नाहक बळी गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील मूळ रहिवासी असलेला मात्र सध्या आजी आजोबांकडे वडणी बुरझड गावी वास्तव्यास असलेल्या दीपक नानाभाऊ पारधी (वय २८) हा तरुण वीज कंपनीत हंगामी कामगार म्हणून काम करत होता. मात्र तो वडणी बुरझड गावी राहत होता. दररोज तो वडणी बुरझड येथून अपडाऊन करत असे. बुधवारी सायंकाळी वडणी बुरझडकडून अमळनेरकडे येतांना त्याने मांडळ पेट्रोल पंपावर देखील पेट्रोल भरले. मात्र सायंकाळी तो परत जात असतांना ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. सायंकाळी तो जाताना डाव्या बाजूला फरशी पुलावरून काठावरून जात असतांना तोल गेल्याने  मोटरसायकलसहित नदीत पडला त्यावेळी त्याची पिशवी तरंगत सकाळी मुडी गावाकडे वाहत येत होती. ती गळ्यात अडकलेली होती पाहणाऱ्यांनी  माजी पंचायत समिती सभापती चंद्रसेन पाटील यांना माहिती दिली. विहिरीजवळ पिशवी व मृतदेह तरंगत दिसले. त्यावेळी काही जणांनी ही माहिती सांगितल्यावर पोलीस पाटील यांच्यासमक्ष पिशवी व प्रेत बाहेर काढण्यात आले. त्याची दुचाकी ही फरशी पुलावरून खाली पडलेली होती व ती फरशी पुलात अडकली होती. त्यानंतर पोलीस पाटील नवनाथ पाटील यांनी मारवड पोलिसात खबर दिली. त्यानंतर जागेवर पंचनामा केला व तरुणाचे शवविच्छेदन करण्यासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी  शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी त्याचा भाऊ देखील उपस्थित होता. या बॅगेसह खिशातील पाकिटात ५०० रुपये होते बॅग व 500 रु रक्कम त्याच्या भावाकडे पोलिसांनी दिली. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

बाप होण्याचे स्वप्न राहिले अधुरे

दीपक याला एक भाऊ असून पत्नी गर्भवती आहे. त्याचे लग्न नुकतेच ७ ते  ८ महिन्यांपूर्वी झाले होते. त्याच्या अपघाती मृत्यूने त्याचे बाप होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. उमद्या तरुणाचा असा बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *