जिल्ह्यातील सिंचनप्रश्नी मंत्रालयात बैठक, आमदार अनिल पाटील यांनी दिली माहिती
अमळनेर(प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्प व निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाबाबत आज मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यामुळे पांझरा माळण प्रकल्पासह, पाडळसरे धरण, जामदा डावा कालवा या प्रकल्पांना गती प्राप्त होणार आहे, अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.
बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांची माहिती मंत्र्यांनी जाणुन घेतली व अडचणी जाणून घेऊन लवकरच या अडचणी दूर करत हे प्रकल्प पूर्णत्वास नेले जातील अशी माहिती दिली. यावेळी अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री सतिश पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, आमदार लताताई सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा, प्रकल्प समन्वय सचिव एन.व्ही. शिंदे, लाक्षेवि सचिव घाणेकर, सहसचिव कपोले तापी खोरे संचालक कांबळे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, उपस्थित आदी उपस्थित होते.
बैठकीत आमदार अनिल पाटील यांनी मतदार संघातील प्रकल्पांची दिली माहिती
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी पांझरा माळण नदीजोड प्रकल्पाविषयी माहिती दिली. प्रस्ताव मंजूर करावा याबाबत मागणी केली व आग्रह धरला. त्यावर मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित सचिवांसह तापी खोरे महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
गिरणा प्रकल्पाअंतर्गत जामदा डावा कालवा नूतनीकरण करून म्हसवे तलाव व भोकरबारी धरण भरण्यासाठी कालवा निधी उपलब्ध करून देणे, पाडळसरे धरणाला कसा निधी उपलब्ध करून देता येईल. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आग्रह धरला अतिपावसाने जिल्ह्यात कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या कापसाचे पंचनामे ताबडतोब झाले पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळात कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे कापसाचे पंचनामे करा व त्याबाबत काय मदत करता येऊ शकते याबाबत चर्चा केली.