रंगवलेल्या भिंती बोलू लागल्याने मंगरूळ झाले शिक्षणाची पंढरी
अमळनेर (प्रतिनिधी) सध्याच्या काळात तरुणाई भरकटत चालल्याचा सूर गावा-गावात आणि शहरा-शहरातून उमटू लागला असतानाचा अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील तरुणाईने आपल्या कल्पकतेने गावातील स्वच्छ भारत अभियानांर्गत बांधलेल्या वैयक्तिक शौचालयांच्या भिंतीवर ज्ञान आणि माहितीचा खजिना रंगवून तो गावातील विद्यार्थ्यांसाठी रिता केला आहे. म्हणूनच गावातील या ज्ञानाने रंगवलेल्या भिंती आता प्रत्येकाशी बोलू लागल्याने मंगरूळ हे गाव शिक्षणाची पंढरी झाले आहे.
अमळनेर शहराच्या पश्चिमेला धुळे रोडवर अवघ्या चार किमी अंतरावर मंगरूळ गाव आहे. लोकसंख्या अधिक असल्याने तालुक्यातील मोठे गाव म्हणून परिचित आहे.
येथील कै. अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी तसेच गावातील होतकरू तरुणांनी एकत्र येत मंगरूळ विकास मंचची स्थापना केली आहे. त्यांनी पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेतला आहे. यातून गाव पाणीदार करण्याचा प्रयत्न केला, मात्र गावातील मुले चांगले शिकले पाहिजे म्हणून त्यांनी एकत्र येत स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावात बांधलेल्या शौचालयांच्या भिंतींचा व इतर भिंतींचा सद्उपयोग करत त्यांना रंगवून त्यावर गणित, मराठी, सामाजिक ज्ञान, राष्ट्रीय संदेश, पाणी वाचवा, वैज्ञानिक माहिती, चांगल्या सवयी, काल मापन आणि काळानुसार लुप्त होत चाललेली माहिती साकारून या भिंतीच्या माध्यमाने संपूर्ण गाव बोलके केले आहे. येताना-जाताना कुठेही नजर गेली तरी मुलांच्या ज्ञानात भर पडून त्याला चांगल्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. गावात आलेल्या पाहुण्याला, अधिकाऱ्यांसाठी हे आकर्षण ठरणार आहे.
भिंती रंगवण्याचा असा केला खर्च
मंगरूळ हे गाव पाणीदार होण्यासाठी तरुण एकत्र आले होते. त्यांनी श्रमदान केले होते. त्या कामातील देणगीतून उरलेली रक्कम आणि नोकरीला लागलेल्या गावातील तरुण एकत्र येत या कामांसाठी मदत करीत आहेत. गावातील भावी पिढी सुसंस्कृत होऊन भविष्यात तरुणांमधील न्यूनगंड निर्माण कमी होऊन त्यांनी आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलू नये, असा त्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे. म्हणून गाव करी ते राव काय करी हे या गावातील तरुणांनी दाखवून दिले आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुलांना गावात फिरून सुद्धा ज्ञान मिळणार आहे खान्देशातील हे एक आकर्षण ठरले आहे
गावातील शाळेच्या उपक्रमातून घेतली प्रेरणा
दोन वर्षांपूर्वी मंगरूळ येथील कै. अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे कल्पक शिक्षक संजय पाटील आणि इतर शिक्षकांनी शाळेच्या भिंती रंगवून त्यावर गणिताची सूत्रे, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, हिंदी साहित्य, विज्ञानाची माहिती रेखाटून भिंती बोलक्या केल्या होत्या. त्यातून प्रेरणा घेऊन या शाळेती माजी विद्यार्थ्यांनी गावातील भिंती ज्ञानाने रंगल्या आहेत.