नगरपालिकेने या भागात लक्ष देऊन समस्या सोडवण्याची होतेय मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ताडेपुरा भागातील नाल्यावर अतिक्रमण करण्यात आल्याने पावसाचे पाणी साचून काही नागरिकांच्या घरापर्यंत येत असल्याने नागरिकांचे नुकसान होऊन आरोग्यही धोक्यात आले आहे. यामुळे नगरपालिकेने त्वरीत या भागाकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ताडेपुरा भागात अमळनेर नगरपरिषदेचे जवळ जवळ अर्ध्ये कामगार वास्तव्यास आहेत. तसेच शहरातील सर्वात मोठी वस्ती म्हणून ताडेपुरा ओळखले जाते. या भागात धरणगाववरील दूध डेअरी शेजारी नाला आहे. पारोळा जकात नाक्या जवळून पाणी या ठिकाणी वाहून ताडे तलावात जाते. मात्र या दरम्यान या भागातील बेकरी शेजारी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले असते. असाच एक प्रसंग काल मध्यरात्रीदेखील आला. या रात्री घरांच्या ओट्यापर्यंत पाणी पोहोचले होते. तर हे पाणी रविवारी सकाळी निघाले आहे. नाल्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने रोगराईदेखील पसरण्याची दाट शक्यता आहे. म्हणून पालिकेने लवकरात लवकर या परिस्थितीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संबंधित नागरिक करीत आहेत.