लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या दोन तास चाललेल्या बैठकीत घेतले महत्त्वपूर्ण निर्णय
अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील बाजारात होणार्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला लिलाव शहराबाहेर करावा आणि हातगाड्यांची मोजणी करून त्यांना १७ प्रभागात विभागून त्याच ठिकाणी व्यवसाय बंधनकारक करण्यात यावा. याबरोबरच नियम न पाळणारी दुकाने सील करण्यात यावेत, असे महत्वपूर्ण निर्णय लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी सर्वानुमते घेण्यात आला. सुमारे दोन तास ही बैठक सुरू होती.
तहसीलदारांच्या दालनात १७ रोजी दुपारी साडे अकरा वाजता आमदार अनिल पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार स्मिता वाघ , प्रांताधिकरी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ , मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड ,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , संजय चौधरी यांची बैठक झाली. यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याबद्दल चिंतन करण्यात आले. दररोज भाजी बाजारात व किराणा दुकानांवर गर्दी होत असून सोशल डिष्टन्सिंगचा फज्जा उडत आहे आणि येत्या काही दिवसात त्याचे दुष्परिणाम जाणवतील म्हणून सर्व दुकानांची वेळ सकाळी ९ ते ५ करण्यात यावी. आधी ही वेळ तीन वाजेपर्यंत होती , तसेच गावात होणारा भाजीपाला लिलाव शहराबाहेर करण्यात यावा आणि गावात न्यू प्लॉट भागात एकच ठिकाणी गर्दी होऊन सर्व हातगाड्यावर भाजीपाला , फळे विक्री होत आहे. फक्त स्थळ बदलले आहे. मात्र ठोस कारवाई नसल्याने गर्दीवर नियंत्रण नाही. त्यामुळे सर्व फेरीवाल्यांची मोजणी करून त्यांना नंबर देऊन १७ प्रभागात विभागणी करायची आणि त्याची नोंदणी ठेवायची. तसेच किराणा दुकानदारांनी घरपोच सेवा सुरू करावी. नियम न पाळणाऱ्या दुकानांना सील करण्यात यावे, असा निर्णय झाला.
सराफ बाजारातील कंटेन्मेंट झोनची पाहणी करून नव्याने निर्णय घेणार
तसेच फक्त अमळनेरात सराफी व्यवसाय बंद असल्याने यावेळी सराफ बाजारातील कंटेन्मेंट झोनची मर्यादा कमी करून व्यवसाय सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र शासन निर्णयाप्रमाणे कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. परंतु तरीही पुन्हा पाहणी करून नव्याने निर्णय घेण्यात यावा, असे ठरले.