अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील घटना, ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कावपिंप्री येथील गावतळ्यातून बेकायदेशीरपणे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने दोन तलाठ्यांच्या दुचाकीवर ट्रॅक्टर चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी १६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथे शाळेच्या मागे गावतल्यातून मुरूम वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळल्यावरून तहसीलदार मिलिंद वाघ यांनी मंडळाधिकारी विठ्ठल पाटील , तलाठी प्रवीण सोनवणे ,आशिष पारधे , विकास परदेशी , पुरुषोत्तम पाटील , प्रथमेश पिंगळे यांच्या पथकाला १६ रोजी २ वाजेला रवाना केले. तेथे गेल्यावर शाळेच्या मागे जेसीबी (क्रमांक एम एच १८ ,झेड ७६२८) हे श्याम राजेंद्र चव्हाण यांच्या मालकीचे उभे होते आणि दोन ट्रॅक्टर मुरूम भरून पळत होते. तेव्हा पुरुषोत्तम पाटील व प्रथमेश पिंगळे यांनी त्यांच्या दुचाकी (क्रमांक एम एच १९ डी एफ ८११७) ने ट्रॅक्टरचा पाठलाग केला. तेव्हा ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. म्हणून त्यांनी दोघांनी दुसरे ट्रॅक्टर (क्रमांक एम एच १९ ए एन ५९५८) चा पाठलाग सुरू करून त्याच्या शेजारी वाहन चालवून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर मालक संदीप जगन पारधी उर्फ सोनू पारधी याने तलाठ्यांच्या दुचाकीवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. त्यात दुचाकींचा पुढचा भाग दाबला गेला. दुचाकीसह तलाठी रस्त्यावर फेकले गेले. सुदैवाने त्यांचा जीव वाचला. त्यांना मुक्का मार लागला. तेव्हढ्यात सोनू पळून गेला. तलाठी प्रथमेश पिंगळे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून श्याम चव्हाण , संदीप पारधी व अज्ञात चालक विरुद्ध भादवी ३०७ प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केला , भादवी ३५३ प्रमाणे सरकारी कामात अडथळा निर्माण केला , तर ३७९ प्रमाणे चोरी व ३३२ प्रमाणे वाहनाचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जेसीबी व २ ट्रॅक्टर असे १२ लाखाचा माल जप्त करण्यात आला असून तपास पीएसआय राहुल लबडे करीत आहेत.