वासरे येथील घटना, मुलांचा मृतदेहपाहून आईवडिलांनी छातीबडवून केला आक्रोश
अमळनेर (प्रतिनिधी) आईवडील शेतात गेल्यानंतर अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलांने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना तालुक्यातील वासरे येथे सोमवारी सकाळी साठेआठ वाजेच्या सुमारास घडली. मुलांने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आईवडिलांनी शेतातूनच हंभरडा फोडत घर गाठले. मुलांचा निपचित पडलेला मृतदेह पाहून छाती बडवून आक्रोश केला.
पावसाळ्याचे दिवस असल्याने वासरे येथील विजय पाटील यांनी त्यांची पत्नी हे सोमवारी सकाळीच शेतात कामाला निघून गेले होते. त्यांचा १५ वर्षाचा मुलगा चंदन हा घरीच होता. घराच कोणीच नसताना चंदन याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ राहणारा दीपक पाटील हा तेथून जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्याने लगेच पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तसेच चंदनच्या आईवडिलांनाही शेतात निरोप पाठवला. मुलाने आत्महत्या केली, या निरोपानेच या दांपत्याच्या पायाखालची वाळूच सरकली त्यांनी हंबरडा फोडत घर गाठले आणि आपल्या काळजाच्या तुकड्याला मृत अवस्थेत पाहून त्यांनी प्रचंड आक्रोश केला. यामुळे उपस्थितांच्या डोळ्यातून पाणी आले. चंदन याला ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. तो नववीच्या वर्गात शिकत होता. पोलिस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पो. ना. मुकेश साळुंखे करीत आहेत.