शिर्डीहून मित्राच्या भावास घेऊन येताना मालेगाव ते पुणे रोडवर भीषण अपघात
घरातील कमावत्या मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी हंबरडा फोडून केला आक्रोश
अमळनेर (प्रतिनिधी) पुण्याला गेलेल्या भावाला शिर्डीहून घेऊन येत असताना तिघा मित्रांच्या मोटारसायकला ट्रकने उडवल्याने एका मित्राचा जागीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि तिसराही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मैत्रीचा धागा एका क्षणात विस्कटल्या. तर मित्राचा भाऊ आणि चौथा मित्र दुसऱ्या मोटारासायकवर पुढे निघून देल्याने सुदैवाने ते वाचले. मालेगाव ते पुणे रोडवर जळगाव चोंडी गावाजवळ सोमवारी १५ रोजी रात्री १ वाजता हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती अमळनेरात येऊन धडकताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील कमावत्या मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या घरात आक्रोश पसरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रीतम गुलाब ठाकूर (वय ३०) याचा भाऊ हर्षल हा मोटारसायकलने पुण्याला गेलेला होता. त्यानंतर तो मोटरसायकलने शिर्डीपर्यंत आला होता. त्याला घेण्यासाठी प्रीतम ठाकूरसह त्याचे विकास जगन्नाथ ईशी (वय २९, रा. झामी चौकातील ) , बालाजी पुरा भागातील साईबाबा मंदिराजवळील गणेश चौधरी (वय ३२), आणि चंद्रकांत पाटील हे चार जण रिवारी १४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारस मोटरसायकलने शिर्डी गेले होते. त्यांची हर्षलसोबत भेट झाल्यानंतर रात्रीच शिर्डीहून परतण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परंतु मित्र विकास याला मोटारसायकल चालवता येत नव्हती म्हणून प्रीतमने गाडी चालवायला घेतली. गणेश त्याच्या मागे बसला. तर चंद्रकांत आणि हर्षल दोन्ही वेगवेगळ्या मोटरसायकलने पुढे निघाले होते. मालेगावजवळील जळगाव चोंडी गावाजवळ एका ट्रकने या तिघा मित्रांच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे विकास, गणेश, प्रीतम मोटारसायकलवरून जोराने खाली आदळले गेले. त्यात विकासचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश व प्रीतमला मालेगाव येथील खाजगी दवाखाण्यात दाखल केले होते. त्यानंतर काही वेळाने गणेशचा देखील मृत्यू झाला. तर प्रीतम गंभीर जखमी झाला आहे. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यामुळे अमळनेरात शोककळा पसरली आहे.
विकासने आईच्या बचत गटाच्या पैशातून चार महिन्यापूर्वीच घेतली होती नवी मोटर सायकल
विकास ईशी याने चार महिन्यापूर्वीच आईच्या बचत गटाच्या पैशातून नवीन मोटर सायकल घेतली होती. त्याचा कटींग सलूनचा व्यवसाय आहे. पण लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद होता. त्याच्या पश्चात विधवा आई, २ विवाहीत बहिणी आणि १ मोठा भाऊ असा परिवार आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.
पती, मोठा मुलगा आणि लहान गणेशचाही अपघाती मृत्यू झाल्याने विधवा आई झाली निराधार
गणेश चौधरी हा त्याच्या विधवा मातेचा एकूलता एक मुलगा होता. तो खूप मेहनती होता. ग्रामिण भागात खेडोपाडी बाजाराचे दिवशी मसाले विक्री करित होता. त्याचे निधनाने ६० वर्षीय वृध्द आई निराधार झाली आहे. दूर्दैवाची बाब म्हणजे त्याचे वडील व मोठ्या भावाचेचे देखील यापूर्वी अपघातीच निधन झाले आहे. तो अविवहीत होता. त्यामुळे त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.