कापूस, ठिबक सिंचन वाहून नुकसान, नदी, नाले तुडूंब वाहिल्याने आबादानी
अमळनेर (प्रतिनिधी) शहर व तालुक्यात झालेल्या मान्सूनच्या दमदार पावसाने शेतकरी आणि नागरिकांची दाणादाण केली आहे. त्यात उतारा केलेल्या कापूस, शेतातील ठिबक सिंचन वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसानही झाले. तर नदी, नाल्यांना पूर आल्याने सर्वत्र आबादानीही झाली आहे.
अमळनेर शहरासह तालुक्यात सर्वत्र मुडी, बोदर्डे, लोणचारम, भरवस, लोण सीम परिसरात धुवांधार पावसाने दमदार हजेरी लावत पहिल्यात नदी, नाले दुथडी भरून वाहिले. शेतकऱ्यांचे शेतांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .ठिबक सिंचनद्वारे लावण्यात आलेले कापूस पिक तसेच ठिंबक संच पूर्णपणे वाहून वाया गेले आहे. शेतातून अक्षरशः नदीसारख प्रवाहाने पावसाचे पाणी वाहिल्याने काळ्या मातीचं थर पूर्णतः वाहून गेलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी शेतांचे बांध बंधिस्ती फोडून एका शेतातून दुसऱ्या शेतात पाणीच पाणी वाहत होते. त्यात मुडी बोदर्डे येथील गुलाब चौधरी यांच्या शेतातील दीड ते दोन एकर शेतातील कापूस तसेच ठिंबक संच पूर्णतः वाहून गेले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मारवड परिसरात तीन तास मुसळदार,नदी, नाले वाहिले दोन घरांची पडझड
अमळनेर तालुक्यातील मारवड परिसरात तीन तास मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव वाहून निघाले आहेत. भोरटेक येथील पाझर तलाव, मारवड येथील माळण नदी, तांबोळा नाला, पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले असून मारवड व परिसर विकास मंचने केलेल्या सिंचन कामांमुळे कोट्यवधी लिटर पाणी अडवले गेले आहे. मारवड परिसर विकास मंचतर्फे माळण नदीला पुरणपोळी व आंब्याच्या रसाचा नैवैद्य दाखवून जलपूजन करण्यात आले. तसेच मारवड येथे दोन घरांचे व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. गावातील यमुना रतन चव्हाण व सुमनबाई रामदास चांभार यांच्या घराची पत्रे सरकल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी मध्यरात्री तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
अमळनेर तालुक्यात एकूण ५३१ मिमी पाऊस
अमळनेर तालुक्यात काल सरासरी ६६.३८ मिमी पाऊसची नोंद करण्यात आली असून यापैकी मारवड मंडळात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मारवड मंडळात १४० मिमी, अमळनेर येथे ६३ मिमी, शिरुड मंडळात २१ मिमी, पातोंडा मंडळात २५ मिमी, नगाव मंडळात ५५ मिमी, अमळगाव मंडळात ८० मिमी, भरवस मंडळात ७७ मिमी, वावडे मंडळात ७० मिमी असा अमळनेर तालुक्यात एकूण ५३१ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.