तहसीलदार मिलिंद वाघ यांनी कोविड सेंटरच्या उपचाराबाबत दिली माहिती
अमळनेर (प्रतिनिधी) शहारात पसरणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहे. त्यासाठीच कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरे व्हावेत आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून त्यांना नियमित उपचारासह योगा प्रशिक्षणदेखील देण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिली.
तहसीलदार वाघ यांनी सांगितले की, कोरोनाची भीती मनातून जावी, रुग्णांमध्ये कोरोनाशी लढण्याचे सामर्थ्य यावे, यासाठी प्रशासनाने कोरोनाग्रस्त रुग्ण, क्वारंटाइन असलेले संशयित रुग्णांसाठी दररोज कोविड सेंटरच्या बाहेर मैदानावर योग प्रशिक्षण घेतले जात आहे. सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान जिल्हा योग प्रचारक कमलेश कुलकर्णी रुग्णांकडून योग आणि प्राणायाम करून घेत आहेत. यामुळे रुग्णांनादेखील ऊर्जा मिळाली असून ते आंनदाने यात सहभागी होत आहेत.
योगा प्रशिक्षणासह रुग्णांना देताहेत आयुर्वेदिक काढा
योगा प्रशिक्षणासह रुग्णांना आयुर्वेदिक काढा, गरम पाणी, नियमित औषधी, व्हिटॅमिनच्या गोळ्या, चहा नाश्ता , पूरक आणि पोषक आहार दिला जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून स्वच्छतागृहांचीही नियमित तपासणी केली जात आहे. लहान मुलांची स्वतंत्र काळजी घेतली जात आहे. त्यांच्यासाठी दूध, केळी आदी सुविधा पुरवल्या जात आहेत. प्रांताधिकरी सीमा आहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, डॉ. प्रकाश ताळे दररोज कोविड सेंटरला भेट देऊन आढावा घेत असतात.