घरपट्टीसह पाणीपट्टी भरण्यासंदर्भात बिडिओंनी काढला तुघलकी फतवा

कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडल्याने कर भरण्याच्या फतव्याने नागरिकांमध्ये संताप ; सामाजिक कार्यकर्ते सतिश पाटील यांनी वसुली स्थगिती केली मागणी…

अमळनेर (प्रतिनिधी ) कोरोनाने शहरासह ग्रामीण अर्थकारणाचे कंबरडे मोडले आहे. आज लोकांना जीवंत कसे राहता येईल, याची चिंता लागली आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शेती कशी करावी, या विवंचनेत शेतकरी असातानाच पंचायत समितीने तुघलकी फतवा काढत घरपट्टी आणि पाणीपट्टी न भरणाऱ्यांना शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. घरपट्टी व पाणीपट्टी निरंक असल्याशिवाय ग्रामपंचायतीच्या कुठल्याही तक्रारी पंचायत समितीस्तरावर स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनाही दिल्या जाणार नाहीत, असा फतवा काढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील जुनोने चे सामाजिक कार्यकर्ते सतिश पाटील यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे विरोध करत कोरोनाच्या महामारीत वसुली स्थगिती करावी अशी मागणी केली आहे.
गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी काढलेल्या तुघलकी फतव्यात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी व पाणीपट्टीची वसुलीची परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. ग्रामीण भागातील जनता ही करभरणा करण्याच्या बाबतीत अत्यंत उदासिन असून ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या सुखसोईबाबत किंवा ग्रामपंचायतीच्या कर्तव्याच्या बाबतीत अत्यंत जागरुक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १२९ नुसार करमागणीच्या बिलाची बजावणी झाल्यानंतर संबंधीत मालमत्ता धारकांनी मुदतीत कराचा भरणा ग्रामपंचायत कार्यालयात केला पाहिजे. यात कसूर झाल्यास संबंधीत मालमत्ता धारकाविरुध्द कलम १२९ नुसार जप्तीची कारवाई करण्यात येईल. तसेच घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याशिवाय ग्रामपंचायतीमार्फत कुठलेही कागदपत्र/वैयक्तीक लाभाच्या योजनेचा लाभ देऊ नये. तसेच ग्रामपंचायत करवसूलीच्या कामात कसूर केल्यास संबंधीत ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषद,जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच, पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार ७० टक्के पेक्षा कमी करवूसली असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरुध्द कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिला आहे.

ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीचे असे दिले वर्षाचे नियोजन

घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे आर्थिक वर्षाचे नियोजन हे एप्रिलमध्ये नमुना नं.८ व ९ तयार करणे, मे महिन्यात बिल व नोटिसा बजाविणे. जूनमध्ये १० टक्के करवसूली करणे. जुलैमध्ये २० टक्के करवसूली करणे. ऑगस्टमध्येन३० टक्के करवसूली करणे. सप्टेंबरमध्ये ४० टक्के करवसूली करणे. ऑक्टोबरमध्येन५० टक्के करवसूली करणे. नोव्हेंबरमध्ये ६० टक्के करवसूली करणे.  डिसेंबरमध्ये ७० टक्के करवसूली करणे. जानेवारीमध्ये ८० टक्के करवसूली करणे. फेबुवारीमध्ये ९० टक्के करवसुली करणे आणि मार्चमध्ये  १०० टक्के करवसूली करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *