दुकानदारांचा आजी-माजी आमदारांच्या हस्ते सत्कार, पर्यायी जागाही देणार
अमळनेर (प्रतिनिधी) दगडी दरवाज्याजवळ गेल्या चाळीस वर्षापासून अतिक्रमण केलेल्या दुकानदारांचा स्थगिती अर्ज न्यायालयाने गुरुवाळी फेटाळण्यात आला. त्यामुळे दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याने शहरातील आजी- माजी आमदारांनी या व्यापाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेतला.
अमळनेर शहरातील ऐतिहासिक दगडी दरवाजा स्मारक वेस समोर आठ दुकानदारांनी गेल्या चाळीस वर्षांपासून अतिक्रमण करून सुमारे सहा फूट रस्ता व्यापला होता. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत होती. म्हणून नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील याना तक्रार केली. त्यानुसार पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ताबडतोब कार्यवाहीचे आदेश दिले होते. बांधकाम विभागाच्या सहाययक अभियंत्यांनी ५ फेब्रुवारी रोजी नोटीस देऊन तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला होता. मात्र ही जागा बाराभाई उर्फ अंदारपुरा मोहल्ला ट्रस्टची असून आम्ही दुकानदारांना भाडेकरू ठेवले आहेत असा दावा अमळनेर येथील वरिष्टस्तर दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने तात्पुरते जैसे थे चे आदेश दिले होते. यावर नगरपालिकेने अॅड किरण पाटील यांच्या मार्फत युक्तिवाद केला. 30 एप्रिल रोजी निकाल लागणार होता ,मात्र कोरोनामुळे निकाल लांबला. अखेर ९ जून रोजी न्या. कराडे यांनी जनहितार्थ व शासकीय मिळकतीचे संरक्षण व्हावे आणि अतिक्रमनास गैरप्रकरे संरक्षण दिल्यासारखे होईल म्हणून ट्रष्ट व दुकानदारांचा अर्ज फेटाळून स्थगिती उठवली. त्यानुसार नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची तयारी केली. मात्र दुकानदार कयूम शेख हाजी जमाल, दिलीप त्रिकम राठोड, भगवान चुडामन बिऱ्हाडे , गणेश प्रकाश पाटील यांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
लोकप्रतिनिधींनी केला दुकानदारांचा सत्कार
त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. आमदार अनिल पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दुकांदारांचा सत्कार केला आणि ते बेरोजगार होऊ नयेत म्हणून दुकानदारांना पर्यायी जागा देण्याचे जाहीर केले. या वेळी मुख्याधिकारी डॉ .विद्या गायकवाड , सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाययक अभियंता बी. एस. फेगडे , सहाययक अभियंता एस. जी. पाटील , शाखा अभियंता बी. एस. माळी , एम. आर. सोनार , अभियंता संजय पाटील, अॅड यज्ञेश्वर पाटील , निलेश साळुंखे , अतिक्रमण विभाग प्रमुख राध्येश्याम अग्रवाल उपस्थित होते.
पोलीस बंदोबस्ताशिवाय काढली चार अतिक्रमणे
नगरपालिकेने ट्रक टर्मिनल , गांधलीपुरा पुलकडील रस्ता ,फायनल प्लॉट १२३ , आणि अतिशय महत्वाचे दगडी दरवाज्यासमोरील अतिक्रमणे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने कौशल्य वापरून कुठल्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय काढली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही